औरंगाबाद: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर हातपाय बांधून मृतदेह ड्रममध्ये टाकला. कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने १९ आॅक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर पसार झालेल्या पतीस पोलिसांनी आज दुपारी सिल्लोडमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पंडित भिकाजी बिरारे (५०,रा. आरेफ कॉलनी, मूळ रा. पानवडोद, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. तर रत्ना पंडित बिरारे (४५)असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पंडित आणि रत्ना हे दाम्पत्य १२ वर्षापासून आरेफ कॉलनीत राहत होते. दोन वर्षापासून ते शेख इसरार शेख हसन यांच्या बंगल्याच्या आवारातील खोलीत राहत. पंडित हा मोलमजूरी आणि रत्ना या शेख यांच्या बंगल्यात धुणीभांडी, साफसफाईचे काम करायच्या. या दाम्पत्याला ऐश्वर्या, सृष्टी आणि सुनयना या विवाहित मुली आहेत.
गुरुवारी (दि.१७ ) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास बिरारे दाम्पत्याची मुलगी सृष्टी पती प्रकाशसह माहेरी आली होती. तेव्हा पंडित हा पत्नीसोबत भांडण करीत होता. सृष्टी आणि तिचे पती प्रकाश यांनी त्या दोघांना समजावून सांगत भांडण करू नका,अशी विनंती केली. त्यानंतर ते त्यांच्या घरी निघून गेले. यानंतर रात्री पंडितने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि हातपाय बांधून मृतदेह घराबाहेरील पाण्याच्या ड्रममध्ये टाकला. ड्रमला झाकन लावले आणि घराला कुलूप लावून पळून गेला. १८ आॅक्टोबर रोजी पहाटे बंगल्यात काम करण्यासाठी रत्ना आली नाही. यामुळे शेख यांनी बिरारे यांच्या खोलीकडे जावून पाहिले तर खोलीला कुलूप लावलेले होते. बिरारे दाम्पत्य अचानक कोठेतरी गेले असेल असे समजून शेख यांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाही. शनिवारी(दि.१९) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास बंगल्याची झाडझुड करण्यासाठी बिरारे दाम्पत्य उठले का हे पाहण्यासाठी शेख त्यांच्या खोलीकडे गेले तेव्हाही खोलीला कुलूप होते.
ड्रममधून सुटली दुर्गंधीड्रमवर माश्या घोंगावत होत्या आणि दुर्गंधी येत असल्याने शेख यांनी ड्रमचे झाकण उघडले तेव्हा त्यात रत्नाचा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ सृष्टी आणि बेगमपुरा पोलिसांना फोन करून माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताचा भाऊ विजय गणपत जोगदंडे (रा. टाऊन हॉल) यांच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविला.