दारुसाठी पैसे न देणाऱ्या पत्नीचा गळा आवळून केला आत्महत्येचा बनाव, पतीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:51 PM2019-10-14T23:51:45+5:302019-10-14T23:52:21+5:30
ठाण्यातील धक्कादायक घटना : शुद्धीवर आल्यावर पत्नीने दिला पोलिसांना जबाब
- जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर पसार झालेल्या सुभाष विशे (४०) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने पतीनेच गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब शुद्धीवर आल्यावर तिने नोंदवला.
हर्षदा (३७) आणि सुभाष विशे हे दाम्पत्य ठाण्याच्या गणेशवाडीतील ‘गणेशकृपा’ या इमारतीमध्ये वास्तव्याला आहे. ती एका खासगी रुग्णालयात कामाला जाते. तर, त्याला दारूचे व्यसन असून कोणताही कामधंदा नाही. यातूनच त्यांच्यात नेहमीच भांडणे होतात. त्यातच तो तिच्या चारित्र्यावरही संशय घेऊन तिला दारूच्या नशेत मारहाण करतो, अशी तिची तक्रार आहे. ७ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ती बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भेटवस्तू घेऊन आली होती. ही पाहिल्यानंतर त्याने तिच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. तिने कामधंदा करा, पैसे देणार नाही, असे पतीला स्पष्ट बजावले. तेव्हा, ‘तुझ्याकडे वाढदिवसाला भेटवस्तू आणण्यासाठी पैसे आहेत, मलाच देण्यासाठी नाहीत का?’ असे म्हणून त्याने हातानेच तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडल्यानंतर मात्र भांबावल्यामुळे त्याने शेजाऱ्यांना बोलवून तिने गळफास घेतल्याचे सांगितले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तिला दाखल केल्यानंतर नौपाडा पोलिसांकडेही हीच माहिती त्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनीही तशी नोंद केली. तिच्या गळ्यावर व्रण न आढळल्याने संशय बळावला आणि चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस आली.
८ आॅक्टोबर रोजी हर्षदाला ठाण्याच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ती १२ आॅक्टोबर रोजी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिचा जबाब नोंदविला. त्यावेळी पतीनेच आपला गळा आवळल्याने शुद्ध हरपल्याचे तिने सांगितले.
पुढे काय झाले, हे आठवत नसल्याचेही ती म्हणाली. सुरुवातीला तपासाच्या अधीन राहून साधी नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती. मात्र, हर्षदा विशे हिने दिलेल्या जबाबानंतर तिच्या पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तिच्या पतीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कपिले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला.