लखनऊ - उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने मंगळवारी (13 ऑक्टोबर) विधानसभेसमोरच स्वत:ला पेटवून घेतलं आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी तिला तातडीने जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये महिला जवळपास 60 ते 70 टक्के भाजली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महराजगंज जिल्हात ही महिला राहत असून तिने सासुरवासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. महिलेचा याआधी एक विवाह झाला आहे. मात्र तिने घटस्फोट घेऊन आशिक अली नावाच्या एका व्यक्तीसोबत दुसरा विवाह केला. पण विवाहानंतर कामासाठी आशिक अली सौदी अरेबियात निघून गेला. पती परदेशी गेल्यानंतर सासरची मंडळी महिलेला आपल्या घरात राहू देत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.
सासुरवासाला कंटाळून महिलेने घेतलं पेटवून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या सासरच्या मंडळींविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात मदत मागितली होती. सासरचे लोक आपल्याला घरात ठेवण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनीच आपल्याला घरी सोडून यावं असं महिलेने म्हटलं होतं. यावर पोलिसांनी तिला हा घरगुती वाद असल्याचं सांगितलं. तसेच यासाठी ती न्यायालयातही दाद मागू शकते असा सल्ला देखील दिला. पती परदेशात राहत असल्याने पोलिसांनीच मदत करावी, अशी या महिलेची मागणी होती.
आत्मदहनाच्या प्रयत्नात महिला 60 ते 70 टक्के भाजली
पोलिसांनी महिलेला निकाहनाम्याची प्रत घेऊन येण्यास सांगितलं. मात्र त्यानंतर महिला पोलीस ठाण्यात मध्ये परत आली नाही. त्यानंतर आज महिलेने विधानसभेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी धाव घेत महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आत्मदहनाच्या प्रयत्नात महिला 60 ते 70 टक्के भाजली गेली. सध्या पोलीस संबंधित महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जनआक्रोश; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
जगभरात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. बांगलादेशमध्ये अशाच घटना समोर येत आहे. यामुळे सोशल मीडियावर लोक आक्रमक झाले आहे. जनआक्रोश पाहायला मिळत आहे. याच दरम्यान बांगलादेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मंत्रिमंडळात बलात्कार प्रकरणात अधिकतम जन्मठेपेची शिक्षा वाढवून मृत्यूदंड करण्यासाठी मंजुरी दिली आहे. सोमवारी ही मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचे प्रवक्ता खांडकर अनवारुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला व बाल अत्याचार अधिनिमयाच्या संशोधनासंबंधित अध्यादेश जारी करू शकतात. कारण सध्या संसदेचं सत्र सुरू नाही. सध्याच्या कायद्यानुसार तेथे बलात्कार प्रकरणात अधिकतम शिक्षा जन्मठेप आहे. पीडितेचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूदंडाची परवानगी दिली जाते.