महिला पोलिसावर प्रेम करणं गुन्हा ठरला, तरुणाला जाळलं अन् गावकऱ्यांनी पोलिसांना घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:19 PM2020-06-02T17:19:53+5:302020-06-02T17:58:49+5:30
कोरोना साथीच्या आजारात १ मे रोजी तो पॅरोलवर घरी परतला. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.
उत्तर प्रदेशात प्रतापगड येथे तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात सोमवारी एका युवकाला हातपाय बांधून त्याला जिवंत जाळण्यात आले. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घटनेविरूद्ध पोलिसांवर दगडफेक व गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. मृतक अंबिका पटेल कानपूरमध्ये तैनात असलेल्या एका महिला पोलीस शिपायावर प्रेम करत होता. महिला शिपायाच्या कुटुंबीयांनी अंबिका पटेल याला जिवंत ठार मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. अंबिका पटेल महिला शिपायाची छेडछाड केल्याबद्दल तुरूंगातही होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर तुरूंगातून सुटला होता.
ही घटना फतनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुजनी गावची आहे. या युवकाच्या हत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. ग्रामस्थांनी दोन पोलीस जीपसह तीन वाहनांना आग लावली. पोलिसांच्या दोन्ही जीप जळून खाक झाल्या. दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे. संपूर्ण घटनेमागे प्रेमप्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले. गावात जाळपोळ करत पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. तसेच पोलीस चार तास गावाबाहेर उभे राहिले. चार तासांनंतर एसपींसह पोलीस दल गावात प्रवेश करू शकले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या डझनभर लोकांना ताब्यात घेतले. प्रयागराज झोनचे आयजी आणि एडीजीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेची माहितीही घेतली. सोमवारी दुपारी घराबाहेर पडलेल्या अंबिका पटेल या युवकाला सायंकाळी उशिरा आंब्याच्या बागेत मृतदेह आढळला. यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी डायल 112 ला कळविले. सीओ घटनास्थळावर राणीगंजला पोहोचले. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यात अनेक पोलिस जखमी झाले व कार सोडून पळून गेले. पोलिसांच्या 2 जीपसह ग्रामस्थांनी तीन वाहनांना आग लावली. ग्रामस्थांनी पोलिसांना गावात येण्यापासून रोखले आणि युवकाची हत्या केली. गावात अशी चर्चा आहे की, अंबिका पटेल शेजारच्या एका मुलीवर प्रेम करत होता. परंतु काही दिवसांनंतर मुलीला यूपी पोलिसात हवालदार पदावर दाखल करण्यात आले आणि तिची पोस्टिंग दुसर्या शहरात झाली.यावेळी, तरुणी अंबिकापासून दूर झाली. दोघांनाही लग्न करायचं होतं. परंतु ही गोष्ट घरातील सदस्यांना कळली. त्यानंतर, अंबिकाने काही दिवसांपूर्वी मुलीसह त्याचे फोटो फेसबुकवर व्हायरल केले होते. यानंतर मुलीच्या वडिलांनी फतनपूर कोतवालीमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पोलिस खात्याशी संबंधित असल्याने पोलिसांनी तातडीने अंबिका पटेलला अटक केली आणि तुरुंगात पाठविले. पण कोरोना साथीच्या आजारात १ मे रोजी तो पॅरोलवर घरी परतला. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.
एसपी अभिषेक सिंह म्हणतात की, अंबिका या युवकाला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले आहे. हत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या तीन वाहनांना आग लावली आणि पोलिसांवर दगडफेक केली. मुलीसह सोशल मीडियावर अंबिकाचा फोटो व्हायरल झाला होता. कुटुंबातील सदस्यांनी या तरूणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मुलीच्या कुटूंबावर खुनाचा आरोप आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.