संशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 07:41 PM2019-07-22T19:41:09+5:302019-07-22T19:42:11+5:30
न्यायालयानं पत्नीला दंड भरण्याचे आदेश दिले
अबूधाबी: पतीच्या अपरोक्ष त्याचा मोबाईल तपासून पाहणं एका महिलेला महागात पडलं आहे. या प्रकरणी न्यायालयानं पत्नीला दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यामुळेच तिनं पतीचा फोन तपासला आणि त्याचे काही मेसेजदेखील कॉपी केले. त्यामुळे पतीनं पत्नीला न्यायालयात खेचलं. 'खलीज टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
महिलेनं पतीचे मेसेज तिच्या दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर केले. पतीच्या अपरोक्ष तिनं ही कृती केली. त्यामुळे अल-खैमा मिसडेमीनर न्यायालयानं तिला ३००० दिरमचा (५६ हजार रुपये) दंड ठोठावला. याशिवाय पतीला न्यायालयीन खटल्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणून १०० दिरम देण्याचेही आदेश दिले. यानंतर न्यायालयानं हे प्रकरण सरकारी वकिलाकडे पाठवलं. पती आणि चॅटिंग करणाऱ्या महिलेची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयानं वकिलाला दिले.
मोबाईल तपासून मेसेज कॉपी करणाऱ्या पत्नीविरोधात पतीनं न्यायालयात धाव घेतली. यामुळे गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग झाल्याची तक्रार पतीनं केली. यानंतर रास अल खैमा पोलिसांनी पत्नीला समन्स बजावलं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर पत्नीनं तिचा गुन्हा कबूल केला. मात्र पतीचे एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप तिनं केला. संबंधित महिला आणि पती कायम चॅटिंग करतात. त्याच संशयातून मोबाईल तपासल्याचं पत्नीनं न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.