मुक्रमाबाद : उपचारादरम्यान महिलेचा झालेल्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र बाºहाळी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी रेणुकादास चेरके यांच्याविरुद्ध दोन वर्षानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र या दरम्यान, चेरके यांचे निधन झाले होते. मयताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली.
रमा शिवाजी कदम (वय २५ रा. माकणी ता. मुखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, २७ जुलै २०१७ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बाºहाळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदरील महिलेची नैसर्गिक प्रसूती झाल्याने तिची तपासणी न करता तत्कालीन वैद्यकीय अधिकारी रेणुकादास चेरके यांनी तिला डिस्चार्ज दिला. या दरम्यान महिलेची प्रकृती जास्तच खालावल्याने सकाळी १०.३० च्या दरम्यान तिला उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे नेण्यात आले. तेथे महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन तशी फिर्याद मुखेड पोलिसांत दिली. पोलिसांनी संबंधित अर्ज मुक्रमाबाद ठाण्याकडे वर्ग केला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलिसांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे चौकशी करुन तसा अहवाल द्यावा, असे लेखी पत्र दिले.
मध्यंतरीच्या काळात मे २०१९ मध्ये या प्रकणातील वैद्यकीय अधिकारी रेणुकादास चेरके यांचे आजाराने निधन झाले. पोलिसांना शल्यचिकीत्सक यांच्याकडील अहवाल मिळाला. अखेर १९ नोव्हेंबर रोजी चेरके यांच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती ठाणे अंमलदार माधव मरगेवाड यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकड गडीमे यांच्या मार्गदर्शनाखली फौजदार गोपीनाथ वाघमारे तपास करीत आहेत.