पिंपरी : पैशांच्या देवाण घेवाणीवरून आलेल्या वितुष्टातून आरोपींनी संगनमताने दोघांचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निगडी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असलेल्या एका तरुणीचा वाकडजवळ नदीत आणि एका तरुणाचा तळेगाव, सांवगडे येथे मृतदेह आढळून आला. निगडी पोलीस पथकाने याप्रकरणी सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, आणखी दोघांची माहिती मिळाली. आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पालीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिंदे म्हणाले, सांगुर्डे जवळ नदीपात्रात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीचे नाव सोनाली वाकडे ऊर्फ मॅक्स (वय ३३, रा. ओटास्किम, निगडी) असे आहे. तर सलमान शब्बीर शेख (वय २७, रा. देहूरोड) याचा मृतदेह तळेगाव जवळ आढळून आला. निगडी पोलीस पथकाने याप्रकरणी रवी वाल्मीकी (वय ३२, रा. देहूरोड), सचिन रोहिदास चव्हाण (वय २३, रा. रुपीनगर), नागेश शिलामन चव्हाण (वय २३, रा. आकुर्डी) यांच्यासह विशाल महेंद्र वाल्मीकी ऊर्फ कचारिया (वय २७, देहूरोड) प्रशांत शशिकांत साळवी या संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, खून प्रकरणाची माहिती पुढे आली.आरोपी पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षातून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. रवी वाल्मीकी याची रुपीनगर निगडी येथील अमर शेख यांच्याबरोबर ओळख झाली. सासूरवाडी पीसीएमसी कॉलनी निगडी येथे असल्याने रवी आणि अमीर यांची नेहमी भेट होत असे. तीन महिन्यांपूर्वी अमीर शेख यास रवीने ५०० रुपये उसने दिले होते. त्यातील १०० रुपये अमीरने परत दिले. उर्वरित रक्कमपरत देण्यास तो टाळाटाळ करीत होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. अमीरने त्याचा मित्र सलमान याला बोलावून घेतले, तेव्हा त्या ठिकाणी सलमान याने रवी यास मारहाण केली. नंतर तीन दिवसांनी सलमान रवी वाल्मीकीच्या घरी आला. शिवीगाळ करून मारहाण करून निघून गेला.अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगडीच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.- १९ जुलैला रवीच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यादिवशी नागेश चव्हाण याच्या रिक्षातून रवी वाल्मीकी तसेच त्याचे मित्र सचिन चव्हाण, विशाल कचरिया रिक्षातून निगडीत आले. त्याठिकाणी सोनाली, सलमान आणि प्रशांत साळवी हजर होते. तेसुद्धा रिक्षातून देहूरोडला गेले. बियरच्या बाटल्या घेऊन ते किवळेच्या पुढे सांगुर्डे गावाजवळ गेले. रात्री दीडच्या सुमारास त्यांनी नियोजनानुसार सोनाली आणि सलमान या दोघांना गळा दाबून ठार मारण्यात आले. सोनालीच्या गळ्यावर पाय ठेवून तिला मारल्यानंतर मृतदेह पवना नदीत फेकून दिला.
पैशांच्या वादातून महिला, तरुणाचा खून; पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 5:08 AM