विवाहित प्रियकरासोबत राहण्यासाठी महिला कॉन्स्टेबलची हेराफेरी; पत्नीने ‘असा’ केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 01:05 PM2020-06-11T13:05:36+5:302020-06-11T13:06:22+5:30
प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी महिला हवालदाराविरोधात विभागीय कारवाईची शिफारस करत पुरुष कॉन्स्टेबलची कोतवाली येथून पवई पोलिस ठाण्यात बदली केली
आजमगड – उत्तर प्रदेशातील आजमगड येथे पोलीस खात्यातील एक सनसनाटी प्रकरण उघड झालं आहे. आजमगडमध्ये एका महिला कॉन्स्टेबलने विवाहित प्रियकरासोबत राहण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये फेरबदल करत तिचे पोस्टिंग जिल्ह्यात करुन घेतलं. पुरुष हवालदाराच्या पत्नीला या प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच तिने बुधवारी संध्याकाळी एसपी कार्यालय गाठलं.
पोलीस पत्नीच्या माहितीच्या आधारे एसपींनी या प्रकरणाची चौकशी केली असता, यातून अनेक सत्य बाहेर आले. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी महिला हवालदाराविरोधात विभागीय कारवाईची शिफारस करत पुरुष कॉन्स्टेबलची कोतवाली येथून पवई पोलिस ठाण्यात बदली केली. मिळालेल्या माहितीनुसार बलिया जिल्ह्यात राहणारा हवालदार सध्या कोतवाली शहरात तैनात होता. तो पोलिस स्टेशनच्या आवारातच राहायला होता. या हवालदाराचे पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध सुरु होते.
हवालदाराच्या पत्नीला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तिने बुधवारी आपल्या माहेरातून थेट अजामगड येथील एसपी. प्रो. त्रिवेणे सिंह यांच्याकडे पोहचली. एसपीला सुरु असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. यानंतर कोतवाली येथे काही तास चौकशी सुरू होती. आरोपाची पुष्टी झाल्यानंतर एसपीने पत्नीच्या तक्रारीवरून तिच्या पती हवालदाराची पवई पोलिस स्टेशनमध्ये बदली केली. त्याला तातडीने पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर महिला कॉन्स्टेबल डीआयजीशी संलग्न असल्याने डीआयजीला पत्र लिहून तिच्याविरूद्ध विभागीय कारवाईची शिफारस केली आहे.
एसपी प्रो. त्रिवेणी सिंह म्हणाले की, ही महिला कॉन्स्टेबल गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने स्वत:च्या जिल्ह्याचा पुरावा लपवून चुकीच्या पद्धतीने शेजारच्या जिल्ह्यात स्वत: ला पोस्टिंग केले होते. महिला कॉन्स्टेबलवर विभागीय कारवाई केल्यानंतर डीआयजीला दुसर्या जिल्ह्यात बदली करण्याचे पत्रही पाठविण्यात आले आहे.