कर्नाटकातील रामनगर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला नवजात बाळ विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ४० वर्षीय महिलेने तिचं ३० दिवसांचं बाळ दीड लाख रुपयांना विकलं होतं. जेव्हा महिलेच्या पतीने आपला मुलगा घरातून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आणि त्याला आपल्या पत्नीवर संशय आला.
पतीचे कर्ज फेडण्यासाठीच पत्नीने बाळाची विक्री केल्याचं सांगितलं जात आहे.पती-पत्नी दोघेही मजुरी करतात. ते पाच मुलांसह आर्थिक परिस्थितीचा सामना करत होते, त्यामुळे त्यांच्यावर ३ लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तिच्या दोन साथीदारांच्या मदतीने ही घटना घडवून आणली.
महिलेच्या पतीने आधी आपल्या मुलाला पैशासाठी विकण्याची ऑफर नाकारली होती, परंतु महिलेने ते मूल बंगळुरू येथील महिलेला विकलं. पतीच्या म्हणण्यानुसार, ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर त्याला बाळ घरात नसल्याचं समजलं. पत्नीने सांगितलं की, मुलाची तब्येत बरी नाही आणि नातेवाईकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं आहे.
पत्नीवर विश्वास ठेवून रात्रीचे जेवण करून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत मुलगा दिसला नाही. पत्नीने पूर्वीसारखीच माहिती पुन्हा सांगितल्याने त्याचा संशय आणखी वाढला. त्याने पत्नीला डॉक्टर किंवा नातेवाईकाचा मोबाईल नंबर विचारला असता तिने तो देण्यास नकार दिला. त्यांच्यात वाद झाला. ७ डिसेंबर रोजी पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या पथकाने महिलेची चौकशी केली असता तिने मूल आपल्या नातेवाईकाकडे असल्याचं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसून चौकशी केल्यानंतर तिने दीड लाख रुपयांना मूल विकल्याचं कबूल केलं. पोलिसांनी तात्काळ बंगळुरूला जाऊन मुलाला ताब्यात घेतलं. या प्रकरणी आई, तिचे दोन साथीदार आणि खरेदीदार या सर्वांना अटक करण्यात आली आहे.