महात्मा गांधी जयंतीनिमित्त 100 कैद्यांना मिळणार शिक्षेत सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:42 PM2018-10-01T23:42:43+5:302018-10-02T20:51:54+5:30
२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्तीनुसार प्रस्ताव मागविले होते.
मुंबई - राज्य सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील कारागृहांतील कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध कारागृहातील 100 कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने बंदीवानांच्या शिक्षेत सूट देण्यासंदर्भात प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केले होते. तीन टप्प्यांत कैद्यांना याचा लाभ मिळणार आहे. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्तीनुसार प्रस्ताव मागविले होते. कैद्याची कारागृहातील वागणूक, गुन्ह्याचे स्वरूप, पॅरोलवर सुटका, सुटी घेतल्यानंतर कारागृहात परतणे आदी महत्त्वाच्या बाबी तपासूनच प्रस्ताव पाठविण्याचे सरकारने स्पष्ट केले होते. शिक्षेत सूट दिलेल्या पात्र कैद्यांची यादी कारागृह अधीक्षकाकडे पाठविण्यात आले आहे. शिक्षेत सूट मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. गृहविभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव, कारागृह विभागाचे महानिरिक्षक आणि विशेष महानिरीक्षकांचा यात समावेश होता.