Yes Bank : सीबीआयने राणा कपूर यांच्या संबंधित 'या' सात ठिकाणी केली छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 04:41 PM2020-03-09T16:41:40+5:302020-03-09T16:43:29+5:30
Yes Bank : सोमवारी मुंबईत सात ठिकाणी छापा टाकला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई - Yes Bankचे संस्थापक राणा कपूर आणि इतरांवर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी मुंबईत सात ठिकाणी छापा टाकला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणा कपूर, डीएचएफएल, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स आणि मुंबईतील डोइट अर्बन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डीएचएफएल वांद्रे कार्यालयाशी संबंधित असलेल्या जागांवर छापे टाकले जात आहेत. सीबीआयने ७ मार्च २०२० रोजी राणा कपूर आणि डोइट अर्बन व्हेंचर्स (राणा कपूर कुटुंबाशी संबंधित कंपनी), डीएचएफएल, Yes Bank चे सीईओ, कपिल वाधवन (डीएचएफएलचा प्रवर्तक) आणि इतरांवर भा. दं. वि. कलम १२० (बी), ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १२ आणि १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने (१) नवी दिल्ली येथे एफआयआर दाखल केला आहे.
सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "राणा कपूर यांनी कपिल वाधवन आणि इतरांसमवेत Yes Bank लिमिटेडद्वारे डीएचएफएलला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने स्वत: ला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्यामार्फत असलेल्या कंपन्यांमार्फत अवास्तव फायदा करून घेण्याचा कट रचला."
"एप्रिल ते जून, २०१८ या कालावधीत Yes Bank ने डीएचएफएलच्या अल्पावधी डिबेंचरमध्ये ३७०० कोटींची गुंतवणूक केली. त्याचबरोबर कपिल वाधवन यांनी राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांना ६०० कोटी दिले. हे ६०० कोटी डीएचएफएलकडून डॉइट अर्बन व्हेंचर प्रा. लि.ला (ए राणा कपूर ग्रुप कंपनी) कर्ज स्वरूपात दिल्याचे दाखवले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे. ईडीने या प्रकरणातील संशयितांची जबाब नोंदविण्याबाबत शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी पूर्वी ईडीने छापे टाकले होते. ईडीने सीबीआयच्या एफआयआरची दखल घेतली आणि येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात सीबीआय वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि अन्य सरकारी एजन्सींच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी सकाळी ३ वाजताच्या सुमारास मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीखाली अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीच्या ताब्यात पाठविण्यात आले आहे.