नवी दिल्ली : किंगफिशर समुहाचा मालक विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यासारखेच Yes Bank चे संस्थापक राणा कपूर ब्रिटनमध्ये 'मजा' करत होते. मात्र, सरकार आणि आरबीआयने मोठ्या चलाखीने राणा यांना त्यांच्याच जाळ्यात अडकविले. येस बँकेला पुन्हा ताब्यात घेण्याच्या इराद्याने राणा भारतात आले आणि ईडीच्या तावडीत सापडले.
गेल्या 8 महिन्य़ांमध्ये जवळपास तीन वेळा येस बँकमध्ये गुंतवणुकीचा व्यवहार जवळपास फायनल होत आला होता. मात्र, तेव्हाच शेवटच्या क्षणी संभाव्य़ गुंतवणूकदारांनी माघार घेतली. काही काळ सरकार आणि आरबीआयला ही समजले नाही की नेमके काय चालले आहे. नंतर येस बँकेचा पुन्हा ताबा घेण्यासाठी उत्सूक आहेत, असा संदेश राणा कपूर यांनी रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहचविला. यामुळे येस बँकेची अवस्था सुधरविण्याचा प्लॅन राणाच अपयशी करत असल्याचा संशय सरकार आणि आरबीआयला आला. तेथूनच राणाला त्याच्याच जाळ्यात ओढण्यासाठी खेळी खेळली गेली. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
आरबीआयच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका गुंतवणूकदाराला आरबीआयने पैसे जमा करण्यास सांगितले होते. दर वेळी हा व्यवहार ठरत असताना अखेरच्या क्षणी राणाचे लोक गुंतवणूकदाराला भेटून त्यांना यापासून लांब राहण्याची धमकी देत होते.
लंडनहून कसे बोलावले? राणा कपूर गेल्या काही महिन्यांपासून लंडनध्ये राहत होते. आता त्याला भारतात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाळे टाकण्यास सुरूवात केली. त्यानेच रिझर्व्ह बँकेला दिलेल्या संदेशावरून रिझर्व्ह बँकेने सकारात्मक असल्याचे त्याला भासविले. त्याला येस बँकेमध्ये अन्य गुंतवणूकदारांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने संधी असल्याचे सांगण्यात आले. राणाने या बँकेची स्थापना 2004 मध्ये केली होती. यामुळे पुन्हा येस बँकेचा कारभारी बनण्याच्या स्वप्नाने राणा अलगद आरबीआयच्या जाळ्यात अडकले आणि भारतात आले. यानंतर ईडीपासून सर्वच तपास यंत्रणांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली, कारण राणा पुन्हा देश सोडून जाण्याची शक्यता होती. अनेकदा राणा त्यांच्या नजरेतून निसटला होता. तेव्हा सुरक्षा यंत्रणांची खरोखरच भंबेरी उडाली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पुन्हा भारत सोडण्याच्या प्रयत्नात पण...राणा नीरव मोदीसारखाच वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका आलिशान प्लॅटमध्ये राहत होता. या सोसायटीच्या गार्डकडून ईडीला टीप मिळाली आणि राणाचा गुपचूप भारतातून पळून जाण्याचा प्लॅन फसला. सरकारने येस बँकेवर निर्बंध लादताना बँकेला उभारी देण्यासाठीचा प्लॅनही घोषित केला. मात्र, याचवेळी राणावरही कारवाईला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.