तरुणीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न, तिघा परप्रांतीयांना अटक, ग्रामस्थ संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:20 AM2023-03-19T08:20:13+5:302023-03-19T08:20:28+5:30
सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचोटी गावाच्या हद्दीत तिच्या पाळतीवर असणाऱ्या तिघांनी तिला खेळाच्या मैदानात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
अलिबाग : कामावरून घरी जात असलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीचे तिघा परप्रातीयांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री चिंचोटी येथे घडली. तरुणीने आरडाओरडा केल्यामुळे एका ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला आणि पुढचा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित नराधमाला पकडून चोप दिला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, ते सर्वजण परराज्यातील आहेत. एका औद्योगिक कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. परिसरात अनुचित घटना घडू नये यासाठी शनिवारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. चिंचोटी गावात राहणारी एक तरुणी शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम आटोपून चालत घरी जात होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचोटी गावाच्या हद्दीत तिच्या पाळतीवर असणाऱ्या तिघांनी तिला खेळाच्या मैदानात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने आरडाओरड केली. रस्त्याने जाणाऱ्या एका बाईकस्वाराने तिचा आवाज ऐकल्याने त्याने धाव घेतली, त्यामुळे आरोपी पळू लागले. ही घटना गावात कळल्यावर ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तीनपैकी एक आरोपी हा ग्रामस्थांच्या हाती लागला. त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. मात्र, तो वावे येथे पळून आला. ग्रामस्थांनी त्याला पुन्हा पकडले. या घटनेनंतर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
फरार दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांसह मोठा फौजफाटा तैनात झाला होता. याप्रकरणी तिघा आरोपींवर अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
लाठीचार्जमध्ये पीडितेचे वडील जखमी
या घटनेतील एका आरोपीला ग्रामस्थांनी पकडून बेदम मारहाण केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला मारहाण झाली असल्याने त्याला रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, आरोपींना आमच्या ताब्यात देण्याबाबत ग्रामस्थ आग्रही होते. पोलिस ग्रामस्थांना दीड तास समजावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ते ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यामध्ये पीडितेच्या पित्यालाही मार लागला आहे.