शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकण्यासाठी गोळ्या घेतल्या, रिअॅक्शनने तरुणीच्या जिवावर बेतल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 09:25 PM2020-02-10T21:25:21+5:302020-02-10T21:26:37+5:30
ठाण्याच्या खोपट येथील घटना
ठाणे : शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविण्याच्या तीव्र ईर्षेपोटी आयुर्वेदीक गोळया घेतल्यानंतर ठाण्यातील मेघना देवगडकर (22, रा. खोपट, ठाणे) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खोपट भागात राहणारी नृत्यांगना असलेली मेघना ही कल्याण येथील एका जीममध्ये व्यायामासाठी नियमित जात होती. शरीरसौष्ठव स्पर्धेत तिला अव्वल राहण्यासाठी वजन कमी करायचे होते. यासाठी तिने ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वजन कमी करण्यासाठी असलेल्या काही गोळया घेतल्या होत्या. त्रास जाणवू लागल्यानंतर तिला त्याचदिवशी खोपट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
स्टिरॉइड घेणं पडलं जीवघेणं; शरीरसौष्ठव स्पर्धेदिवशीच झाला मृत्यू
प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. ज्या गोळया तिने घेतल्या त्यावर बंदी होती किंवा कसे? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले. जीममध्ये वर्कआऊटला निघण्याआधी तिने या गोळया घेतल्या का? अशा सर्व बाबी पडताळण्यात येत आहेत. गोळया घेतल्यानंतर तिला उलटयांचा त्रास सुरु झाला. त्यानंतर साधारण १५ तासांच्या आत तिचा मृत्यू झाला. आता या गोळया कोणत्या होत्या? तिला त्या कोणी दिल्या या सर्व बाबीही तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.