अपहरणाच्या संशयातून तरुणाच्या भावाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:56 AM2020-03-16T06:56:18+5:302020-03-16T06:56:37+5:30
भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७), असे मृताचे नाव असून त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (४१) व वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत.
वैजापूर (जि. औरंगाबाद) : प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयावरुन तरूणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याच्या आई-वडीलांना मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्री तालुक्यातील लाख खंडाळा येथे घडली. भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७), असे मृताचे नाव असून त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (४१) व वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी देविदास छगन देवकर व त्याचा भाऊ रोहिदास छगन देवकर या दोघांना अटक केली असून खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील २० वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत शुक्रवारी दाखल झाली. भिमराजचा मोठा भाऊ अमोल बाबासाहेब गायकवाड याने प्रेमप्रकरणातून तिचे अपहरण केल्याचा संशय देवकर कुटुंबियांना होता. अमोलदेखील शुक्रवारपासून गावात नाही. अमोलचे कुटुंब लाख खंडाळा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील वस्तीवर राहते तर देवकर यांचे घर लाख खंडाळा येथे आहे. तरुणीचे अपहरण झाल्याच्या संशयातून देविदास व रोहिदास हे दोघे तलवारीसारखे तीक्ष्ण हत्यार घेऊन शनिवारी रात्री आठच्या सुमारास वस्तीवर धडकले.
बाहेर झोपलेल्या भिमराजवर हल्ला करुन दोघांनी त्याला ठार केले व नंतर आई वडीलांनाही जखमी केले. याप्रकरणी देविदास देवकर व रोहिदास देवकर या दोघांविरुद्ध खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अंत्यविधी आरोपींच्या घराच्या ओट्यावर करा, अशी मागणी गायकवाड कुटुंबियांनी केली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर गायकवाड यांच्या वस्तीजवळ भिमराज याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.