"सासू मला छळते, पैसे मागते, मारहाण करते"; वैतागलेल्या जावयाने केला गंभीर आरोप अन् नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 06:00 PM2023-02-19T18:00:58+5:302023-02-19T18:08:41+5:30
"माझे सासू-सासरे माझ्याकडे पैशाची मागणी करायचे. मी माझ्या मुलांचं पोट भरण्यासाठी काम करायचो."
कोटा येथे सासूच्या टोमण्यांना कंटाळून जावयाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येनंतर तीन दिवसांनी तरुणाच्या पाकिटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटवरून या प्रकरणातील धक्कादायक खुलासा झाला आहे. चेतन जांगीड असं या तरुणाचं नाव असून हा केशवपुरा सेक्टरचा रहिवासी होता. चेतनने चार दिवसांपूर्वी स्वत:च्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलं. सासरच्या मंडळींनी मारहाण करून लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करत मृताच्या नातेवाइकांनी न्यायाची मागणी केली आहे.
चेतनने आपल्या सुसाईड नोटमध्ये सासूला तुरुंगात पाठवण्याबाबत आणि त्याच्या संपत्तीतील हिस्सा पत्नीला न देण्याबाबत लिहिले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. चेतनने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, "मी चेतन आणि पूजा आम्ही दोघं एकत्र राहायचो. माझे सासू-सासरे माझ्याकडे पैशाची मागणी करायचे. मी माझ्या मुलांचं पोट भरण्यासाठी काम करायचो."
"पूजाच्या आईला तुरुंगात टाका"
"सासू-सासऱ्यांनी पूजाचे दागिने विकले. दोन लाख द्या आणि मुलांना घेऊन जा, असे सांगितले. मी त्यांना दोनदा घ्यायला गेलो असता त्यांनी मला बेदम मारहाण करून पोलीस ठाणे गाठले. ते मला सांगतात की तुझ्या आई-वडिलांच्या घरातून हिस्सा घेऊन ये. माझ्या सासूबाईंचे टोमणे ऐकून मी अस्वस्थ होतो. माझ्या मृत्यूनंतर पूजा आणि मुलांना कोणताही हिस्सा देऊ नये. पूजाच्या आईला तुरुंगात टाका."
"मी पूजाला फसवले नाही"
"माझ्या मृत्यूनंतर पूजा आणि दोन्ही मुलांना कोणत्याही गोष्टीत हिस्सा देऊ नये. मला माझ्या आई-वडिलांकडून कोणताही हिस्सा द्यायचा नाही. पूजा आणि माझे काही भांडण झाले नाही. तिच्या आईने माझ्याकडे पैसे मागितले. जयपूरला आलास तर मारून टाकेन असं सांगितलं. माझे सासू, सासरे आणि पूजा यांच्यावर कारवाई करा. मी मुलांची शपथ घेतो. मी पूजाला फसवले नाही" असं ही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.