दिग्रस (यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आयाेजित एका पार्टीत युवकाचा खून करण्यात आला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद जीवघेणा ठरल्याचे स्पष्ट झाले.
कोंडबा लक्ष्मण हटकर (३४) रा. राहटी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याला गंभीर जखमी अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली होती. दरम्यान, बुधवारी राहटी येथे मतमोजणीनंतर नारायण गव्हाणे यांचा विजय झाल्याबद्दल एका शेतात पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला जातो असे सांगून कोंडबा दुपारीच घरुन निघून गेला. तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला.
दोघात वाद सुरू असतानाच विश्वासने कोंडबाच्या छातीवर सुरा फेकून मारला. यात कोंडबा रक्तबंबाळ होऊन कोसळला. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी कोंडबाची पत्नी संगीता, भाऊ भीका यांनी पोलीस ठाणे गाठून कोंडबाचा खून झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तत्पूर्वी बुधवारी रात्रीच विश्वास गव्हाणे याला ताब्यात घेऊन भादंवि ३०२, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळपासून कोंडबाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी राहटी येथील काही महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यवतमाळहून पोलीस कुमक बोलाविलीकोंडबाच्या कुटुंबीयांनी दिग्रस पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी यवतमाळ येथून राखीव पोलीस दलाला पाचारण केले होते. तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल शहरात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनात सोनाजी आमले पुढील तपास करीत आहे. दरम्यान गुरुवारी दुपारनंतर कोंडबाच्या नातेवाईकांनी उत्तरीय तपासणीस सहमती दिली. पोलिसांनी या प्रकरणात तपासाअंती जादा आरोपी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली.