टिप्परच्या धडकेत युवक जागीच ठार; समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 08:56 PM2021-03-26T20:56:45+5:302021-03-26T20:57:17+5:30
Accident : ही घटना मेडशीपासून (ता.मालेगाव) १० किलोमिटर अंतरावरील सुकांडा येथे शुक्रवारी दुपारी घडली.
वाशिम : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी पोकलनव्दारे मुरूम काढून तो टिप्परमध्ये भरणे सुरू असताना दोन वाहनांच्या मधात फसून २४ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना मेडशीपासून (ता.मालेगाव) १० किलोमिटर अंतरावरील सुकांडा येथे शुक्रवारी दुपारी घडली.
याबाबत मालेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश श्रीराम जामकर (२४) हा दोन ते तीन दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या कामावर मजूरीचे काम करायला सुकांडा येथे गेला होता. आज दुपारच्या सुमारास पोकलनने मुरूम काढून टिप्परमध्ये भरणे सुरू होते. अशात टिप्पर चालकाने निष्काळजीपणाने वाहन पोकलनच्या दिशेने ‘रिव्हर्स’ घेतले. यावेळी गणेशला टिप्परची जबर धडक लागून तो दोन्ही वाहनांच्या मध्ये फसला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोकलनचालक सुमेध दगडू कवडे याने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून टिप्पर चालक संपत कुंडलिक गाडेकर (रिधोरा) याच्यावर भादंविचे कलम २७९, ३०४ ‘अ’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.