उस्मानाबाद : गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या जिल्हाभरातील प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक अवस्थेत आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये सध्या ठणठणाट निर्माण झाला आहे. तर उर्वरित प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ १.११ टक्के एवढचा उपयुक्त साठा उरला आहे. गतवर्षी ७.६३ टक्के एवढा उपयुक्त साठा होता, हे विशेष.
गतर्षी अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच काही प्रकल्पांनी तळ गाठला होता. उन्हाळा सुरू झाल्यानंतर विशेषत: लघु प्रकल्प आटण्यास सुरूवात झाली. आजघडील प्रकल्पांतील साठा चिंताजनक अवस्थेत आहे. जिल्ह्यात केवळ एक मोठा प्रकल्प आहे. सदरील प्रकल्पात सध्या उपयुक्त साठा उरलेला नाही. गतवर्षीही केवळ ०.७१ टक्के उपयुक्त साठा होता. दरम्यान, मध्यम प्रकल्पांची अवस्थाही फार बिकट बनली आहे. या प्रकल्पांची संख्या १७ एवढी आहे. यापैैकी जवळपास पन्नास टक्क्यांवर प्रकल्प आटले आहेत. तर दोन पकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा उरला असून सहा प्रकल्प जोत्याखाली आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून आजघडीला ०.५७ टक्केच उपयुक्त साठा उरला आहे. सदरील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होवू लागली आहे. मागील आठवड्यात ०.९६ टक्के उपयुक्त साठा होता, हे विशेष.दरम्यान, जिल्हाभरात लघु प्रकल्पाचे जाळे आहे. या प्रकल्पांची संख्या २०५ एवढी आहे. आजघडीला यापैैकी ११२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. दोन प्रकल्पांमध्येच केवळ २६ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. १८ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा उरला आहे. तर दुसरीकडे ७३ प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत.
जिल्हाभराती सर्व लघु प्रकल्पांत मिळून १.५८ टक्के एवढाच उपयुक्त साठा उरला आहे. गतवर्षी ६.२२ टक्के इतका उपयुक्त साठा होता. मागील आठवड्याच्या तुलनेत लघु प्रकल्पांच्या साठ्यात ०.२१ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान, प्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाण्यासाठी या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये सध्या भीषण टंचाई आहे. प्रशासनाकडून टँकरसह जलस्त्रोंतांचे अधिग्रहण करण्यात येत असले तरी या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे सर्वत्र चित्र पहावयास मिळत आहे.
टँकरची संख्या सव्वादोनशेवर प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक अवस्थेत असल्याने सध्या टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसागणिक टँकरच्या संख्येत भर पडत आहे. आजघडीला २३३ टँकर आणि नऊशेवर अधिग्रहणाच्या माध्यमातून टंचाईग्रस्तांची तहान भागविली जात आहे.