श्रीराम मंदिर निर्माणासाठी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:25 AM2021-01-10T04:25:07+5:302021-01-10T04:25:07+5:30
उस्मानाबाद : श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक राम भक्तांचे योगदान ...
उस्मानाबाद : श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक राम भक्तांचे योगदान व्हावे, यासाठी मकर संक्रांतीपासून १ महिन्यात विशेष अभियान घेण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख घरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा करण्यात येणार आहे. श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण कार्यात गावोगावच्या अधिकाधिक नागरिकांचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात, या हेतूने येत्या मकर संक्रांतीपासून महिनाभरात घरोघरी जावून रामभक्त कार्यकर्ते निधी समर्पण जमा करणार आहेत. जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटुंबाला समर्पित करता यावा, यासाठी १०० व १००० रुपयांचे कुपन काढण्यात आले. त्यावर असलेले नियोजित श्रीराम मंदिरचे आकर्षक दिवाही त्या कुपनमुळे घरोघरी जाणार आहे. या अभियानात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या आधी तयारीसाठी जिल्ह्यामध्ये येडशी १० जानेवारी रोजी संमेलन होणार आहे. अभियान काळात कोरोनाच्या संख्येची मर्यादा पाळून सर्व ठिकाणी मिरवणूक, भजन, कीर्तन, यात्रा काढून अभियानाची सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा पातळीवर श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महंत तुकोजीबुवा हे राहणार आहेत.
चौकट...
श्रीराम मंदिर निर्माणासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी येथील आयआयटी तसेच सीबीआरआय रुरकी व एल ॲण्ड टी, टाटा इंजिनिअरींग सर्व्हिसेसचे तंत्रज्ञ मंदिराच्या मजबूत पायासाठी विचार करत आहेत. लवकरच त्याचे स्वरूप अंतिम हाेईल. मंदिराची लांबी ३६० फूट व रुंदी २३५ फूट असणार आहे. प्रत्येक मजला २० फूट उंचीचा असणार आहे. देशातील नव्या पिढीला श्रीराम जन्मभूमी मंदिराचा इतिहास ज्ञात व्हावा, यासाठी या अभियानात घरोघरी जावून हा इतिहास सांगितला जाईल.