उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 07:04 PM2019-02-07T19:04:26+5:302019-02-07T19:09:33+5:30

पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

230 acquisitions for 150 villages for the reduction of water shortage in Osmanabad district | उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

googlenewsNext
ठळक मुद्दे९७ प्रकल्पात मृतपाणीसाठा १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा ७४ प्रकल्प कोरडेठाक 

उस्मानाबाद : ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात १५० गावांसाठी २३० विंधन विहिरींची अधिग्रहणे आहेत़ १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ विशेषत: जिल्ह्यातील ६४ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले असून, तब्बल ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़

गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ शेतशिवारातील विहिरी, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून विंधनविहिरी अधिग्रहण, टँकर सुरू केले जात आहेत़ सध्या जिल्ह्यातील १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ हे टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर दुसरीकडे तब्बल १५० गावांसाठी २३० विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़

उस्मानाबाद तालुक्यातील ७ गावांसाठी १४ टँकर, ५१ गावांसाठी ५८ अधिग्रहणे, तुळजापूर तालुक्यातील १९ गावांसाठी २५ अधिग्रहणे, उमरगा एका गावासाठी एक अधिग्रहण, लोहारा तालुक्यातील ११ गावासाठी १५ अधिग्रहणे, कळंब तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर, ३२ गावांसाठी ५६ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील सहा गावांसाठी सहा टँकर, दोन गावांसाठी दोन अधिग्रहणे, वाशी तालुक्यातील ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे, परंडा तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर व २३ गावांसाठी २७ अधिग्रहणे मंजूर करण्यात आली आहेत़

एकीकडे प्रशासन टंचाई निवारणार्थ प्रयत्न करीत आहे़ मात्र, दुसरीकडे प्रकल्पातील पाणीपातळीतही झपाट्याने घट होत आहे़ सध्या जिल्ह्यातील ६४ प्रकल्प कोरडेठाक असून, ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ ३७ प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी उपयुक्त पाणी आहे़ १८ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर सहा प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी आहे़ केवळ एका प्रकल्पात ७५ टक्क्यावर उपयुक्त पाणी आहे़

टँकर सुरू असलेली गावे
उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई (ढो़), नांदुर्गा, खामगाव येथे प्रत्येकी एक तर येडशी येथे सहा व बेंबळी येथे तीन टँकर सुरू आहेत़ कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव येथे प्रत्येकी एक, भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी प्रत्येकी एक तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी येथे प्रत्येकी टँकर सुरू आहे़ या सर्व गावातील ५४ हजार ४६४ नागरिकांची टँकरद्वारे तहान भागविली जात आहे़

मोठ्या प्रकल्पांची स्थिती
जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात ६़५८ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे़ तर केज येथील मांजरा प्रकल्पात मृतपाणीसाठा आहे़

चार मध्यम प्रकल्प कोरडेठाक
उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर, परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी व साकत हे चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत़ तर उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, वाघोली, कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांची स्थितीही बिकट आहे़

Web Title: 230 acquisitions for 150 villages for the reduction of water shortage in Osmanabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.