'राष्ट्रीय शिष्यवृत्ती' पटकावलेल्या ४१० विद्यार्थ्यांना २ वर्षांपासून एक छदामही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 06:09 PM2019-07-04T18:09:02+5:302019-07-04T18:12:05+5:30
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत राष्ट्रीय पातळीवर मुलांनी मेरिट पटकावले; शिष्यवृत्तीचा नाही पत्ता !
उस्मानाबाद : आर्थिक मागास घटकांतील विद्यार्थ्यांतून प्रज्ञावान मुलांचा शोध घेऊन त्यांची प्रज्ञा जोपासली जावी, त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सुलभतेने पूर्ण व्हावे यासाठी आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पात्र विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रूपये या प्रमाणे प्रतिवर्ष बारा हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ४१० विद्यार्थ्यांना छदामही मिळालेला नाही, हे विशेष.
गुणवत्ता असूनही अनेकवेळा केवळ आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात. वेळप्रसंगी शिक्षणावर पाणी फेरले जाते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (एएमएमएस) सुरू केली आहे. आठवीच्या वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. २०१७-१८ पूर्वी ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रूपये म्हणजेच प्रतिवर्ष ६ हजार रूपये दिले जात होते. परंतु, वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने केंद्र शासनाने शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ केली. आता प्रतिमहा १ हजार रूपये या प्रमाणे वर्षाकाठी संबंधित विद्यार्थ्यास १२ हजार रूपये मिळतात.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता, २०३ जण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते. तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात २०७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्रतिमहा १ हजार रूपये जमा होणे अपेक्षित होते. परंतु, सध्या तरी तसे होताना दिसत नाही. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीधारक झालेले विद्यार्थी दहावी परीक्षा देऊन बाहेर पडले. तरीही त्यांच्या खात्यावर मागील दोन वर्षात छदामही जमा झालेला नाही. अशीच अवस्था २०१८-१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आहे. त्यांनाही वर्षभरापासून शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे सर्व चित्र पाहता, योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसते. दरम्यान, यासंदर्भात पालक माध्यमिक शिक्षण विभागाकडे संपर्क साधत आहेत. परंतु, त्यांच्याही हातात काही नसल्याने ते वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवित आहेत. याबाबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह पालकांतूनही तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
मी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. अभ्यासातील सातत्यामुळे ही परीक्षा उत्तीरर्णच नव्हे, तर शिष्यवृत्तीधारक झाले. त्यामुळे प्रतिमहा १ हजार रूपये या प्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु, दोन वर्षांपासून छदामही मिळालेला नाही.
- स्रेहल पाटील, विद्यार्थिनी, उस्मानाबाद.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७-१८ मध्ये ‘एनएमएमएस’ परीक्षेत यश मिळविले. त्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण सुलभ होणार, म्हणून मी निर्धास्त होते. परंतु, घडले उलट. अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही.
- मयुरी हजारे, विद्यार्थिनी, राघुचीवाडी.