बालाजी अडसूळ
उस्मानाबाद - शरद पवारांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देण्यासाठी कलाकार मंगेश निपाणीकर गेल्या महिनाभरापासून मेहनत घेत होते. उस्माबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात निपाणी हे गाव आहे. या गावचे रहिवाशी असून ते ग्रास पेटींग आर्टीस्ट आहेत. पवारांच्या प्रतिमेसाठी 4.5 एकर शेतजमिनीत आखणी, पिकांची निवड आणि त्याच्या रेखीव कामाच नियोजन करण्यापर्यंत सर्व बाबींवर ते विशेष लक्ष देत होते. ग्रास पेटींग या कलाप्रकारात यापूर्वी मंगेश यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती. त्यानंतर, शरद पवारांची साकारलेली प्रतिमा सोशल मीडियावर आणि माध्यमांत चर्चेचा विषय ठरली आहे.
मंगेश निपाणीकर यांनी 'ग्रास पेटींग' कलाप्रकारातून गतवर्षी देशातील पहिली अशी निलंगा जि. लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेसहा एकर क्षेत्रावर, अडीच लाख स्क्वेअर फूट आकाराची भव्य प्रतिमा साकारली होती. त्यानंतर उपरोक्त कलाप्रकारात त्यांची निपाणी येथे १ लाख ८० स्क्वेअर फूट आकाराची साकार केलेली शरद पवार यांची ही दुसरी विक्रमी कलाकृती आहे. गत पंधरा दिवसांपासून घेतलेल्या अथक परिश्रमाला अगदी '१२/१२' ची योग्य टायमींग साधण्याची कसरत करावी लागली. यास गुरूवारी दुपारनंतर यश आले. ही कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांचे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मोठं योगदान आहे. देशाचे दहा वर्षे कृषि मंत्री असलेल्या अशा नेत्यांस एक शेतकरी पुत्र म्हणून मी शेती पिकांतून प्रतिमा साकारून शुभेच्छा दिल्या आहेत, असे निपाणीकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. तसेच, हवं तशाप्रकारे पिकांची वाढ झाल्यामुळे तब्बल 15 दिवसांनी शरद पवारांची प्रतिमा साकारल्याचं समाधान मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
६०० किलो बियाणे अन् 5 प्रकारचं वाणंमंगेश निपाणीकर यांनी या कलाकृतीसाठी एकूण पाच प्रकारच्या वाणांच्या ६०० किलो बियाण्यांचा वापर केला आहे. यात २०० किलो अळीव, ३०० किलो मेथी, ४० किलो गहू, ४० किलो ज्वारी व २० किलो हरभरा असा वापर करण्यात आला आहे. ४ डिसेंबरला यामध्ये कल्पकरित्या बियाणं पेरण्यात आलं. चांगली उगवणक्षमता होण्याकरीता ओलाव्याची काळजी घेतली. याकरीता आवश्यक त्या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
ग्राफिक्स डिझाईनवरील रेखांकनजवळपास साडेचार एकर क्षेत्राची पंधरा दिवस पेरणीपुर्व मशागत केली. यानंतर या जमिनीवर शरद पवार यांची प्रतिमा साकार करण्यासाठी तंतोतंत रेखांकन करण्यात आले. हे रेखांकन ग्राफिक्स डिझाईनवर बेतलेलं होतं. त्यासाठी विविध आकारमानं परिणामकारकरित्या मांडण्यात आली. केलेल्या कष्टाला गुरुवारी यश आले. अखेर सकाळपासून अंकूर फुटण्यास सुरूवात झाली. पुरेसे बिंजाकूर दृष्टीपथात आल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आकाशातून यावर नजर टाकली असता साकार झाली ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शेतीतली अन् मातीतली हिरवीगार प्रतिमा.