ऑक्सिजन तुटवड्याबाबत आ. पाटील यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:26+5:302021-04-18T04:32:26+5:30

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. शुक्रवारी रात्री तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासह ...

About oxygen shortage. Review by Patil | ऑक्सिजन तुटवड्याबाबत आ. पाटील यांनी घेतला आढावा

ऑक्सिजन तुटवड्याबाबत आ. पाटील यांनी घेतला आढावा

googlenewsNext

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. शुक्रवारी रात्री तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयात एकाच वेळी ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर होते. या पार्श्वभूमीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी सकाळी येथील जिल्हा रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

यापूर्वी १५ एप्रिलपर्यंत ऑक्सिजन टँकचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. हा प्रकल्प १० के. एल. क्षमतेचा असून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी आवश्यक त्या परवानग्या व नाहरकत प्राप्त होतील, असे अपेक्षित आहे. लिक्विड ऑक्सिजन भरून उद्यापासून हा प्रकल्प सुरू करता येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनबाबतीत देखील निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यात काही अडचणी येत असल्याचे समजल्यानंतर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे पीएम केअर फंडमधून जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन त्याचाही आ. पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ६० सिलिंडर इतकी असून, जिल्हा रुग्णालयात लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी १० टक्के गरज या माध्यमातून पुरविली जाणार आहे. हा प्रकल्पदेखील येत्या सात ते आठ दिवसांमध्ये कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता कुलकर्णी, डॉ. धनंजय पाटील, डॉ. सचिन देशमुख, डॉ. मुल्ला, डॉ. गोस्वामी, जि. प. सदस्य राजकुमार पाटील, नितीन भोसले, राजसिंहा राजेनिंबाळकर, अण्णा लोंढे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट :-

स्थानिक विकास निधीतून ‘रेमडेसिविर’ची सोय करा

गेल्या तीन दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या केवळ ३०० वायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर शनिवारी अधिकच्या २०० वायल्स अपेक्षित आहेत. हा तुटवडा लक्षात घेता आमदार स्थानिक विकास निधीमधून एक हजार रेमडेसिविर वायल्सची सोय करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सुचविले आहे. तसेच ऑक्सिजन उपलब्धतेच्या अनुषंगाने ओ टू कॉन्सन्ट्रेटर व बायपॅप मशीनदेखील आमदार निधीमधून खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: About oxygen shortage. Review by Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.