संवर्धनासाठी झाडे घेतली दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:20+5:302021-03-31T04:33:20+5:30
उमरगा : शहरातील विविध महामार्गाच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने हजारो वृक्षारोपण झाले. मात्र, त्याचे संवर्धन व जतन करण्याकडे दुर्लक्ष ...
उमरगा : शहरातील विविध महामार्गाच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने हजारो वृक्षारोपण झाले. मात्र, त्याचे संवर्धन व जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मॉर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांनी त्याचे जतन केल्याने गतवर्षीच्या झाडांनी आतापर्यंत तग धरला. दरम्यान, रविवारी होळीच्या सणाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी मॉर्निंग वॉक ग्रुपने झाडे दत्तक घेऊन पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
सामाजिक वणीकरण विभागासह अन्य विभागाच्या वतीने जुलै महिन्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र भर उन्हाळ्यात त्यांचे संगोपन व जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षारोपण हे केवळ दिखावा असल्याचे दिसून येते. गतवर्षीही उन्हाळ्यात वृक्षलागवड करण्यासाठी घेतलेल्या खड्डयात वृक्ष लावण्यासाठी जूनच्या प्रारंभी डिग्गी रोडलगत नवीन रोपे आणून ठेवली होती. मात्र, त्याची लागवड झाली नसल्याने अनेकांनी ते रोपे पळविली. दरम्यान, आता सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनीच आता वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. कोरेगाव रस्त्याच्या दुतर्फा व स्मशानभूमी परिसरात हजारो वृक्षारोपण करण्यात आले असून, उन्हाळ्यात पाण्याअभावी ही झाडे सुकून जात आहेत. यासाठी पाण्याचे नियोजन, संवर्धन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने होळी सणानिमित्त कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमी परिसरात लावलेल्या झाडांभोवताली वाढलेले गवत काढून आळे तयार करून पाणी घालण्यात आले. शिवाय, या पालकत्व घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा निश्चय डॉ राजकुमार कानडे, सतीश साळुंके, लिंगराज दंडगे, उदय बिराजदार, विजय दळगडे, वनराज सूर्यवंशी, रणजित बिराजदार, महेश आळंगे, विजय दिंडोरे, माळी, कानेकर, युसूफ मुल्ला यांच्यासह ग्रुपच्या सदस्यांनी केला आहे.