उस्मानाबाद - तालुक्यातील नितळी येथील एका शेतमजुराच्या मुलाने सी.ए.ची परीक्षा पास केली. गोपाळ जगताप असे याचं नाव असून गोपाळच्या या देदिप्यमान यशानंतर गावासह जिल्हाभरात त्याचं कौतुक होत आहे. तर, गोपाळच्या यशानंतर पोरानं आईच्या कष्टाचं चीज केलं, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. गोपाळच्या या यशाबद्दल सरपंच अन् गावाकडून त्याचा सत्कार करण्यात आला.
गोपाळ 10 वर्षाचा असताना त्याचे वडिल अनुरथ यांचे निधन झाले होते. त्यानंतर आई इंदूबाई जगताप यांनी शेतमजुरी करून मोठ्या कष्टाने पोराला शिकवलं. गोपाळला तीन बहिणी असून त्यांच्या पालन पोषणासह लग्नाच खर्चही आईने मोठ्या हिमतीने उचलला. विशेष म्हणजे तीन मुलींचे लग्न करून गोपाळला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचविण्याचं कामही या माऊलीनं खंबीरपणे पूर्ण केलं. गोपाळच्या शिक्षणाचा खर्च भागवणे हे इंदूमती जगताप यांच्यासमोर आव्हान होते, तरी ही माता डगमगली नाही. त्यामुळेच आपल्या आईचे कष्टही गोपाळला पावलोपावली जाणवत होते. त्यामुळेच गोपाळनेही मोठ्या जिद्दीने आईच्या कष्टाचे चीज केलं. आईचं स्वप्न पूर्ण करत, गोपाळने सीएचीपरीक्षा पास केली. गोपाळचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून अकरावी आणि बारावी कॉमर्स शिक्षण उस्मानाबादच्या आर.पी. कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर सी. ए. पदवीसाठी गोपाळने सन 2010 मध्ये पुणे गाठलं. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने सी.ए. होण्याचे स्वप्न साकार केलं. पती वारल्यानंतर न डगमगता मुलांचे पालन पोषण करणाऱ्या माता इंदूमती यांचा आणि आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून सी.ए. परीक्षा पास होणाऱ्या गोपाळचा गावकऱ्यांकडून सत्कार होत आहे. आपल्या लेकराचा गावाकडून होणारा सत्कार पाहून त्या माऊलीचं डोळे न पाणावतील तर नवलंच. गोपाळच्या उत्तुंग यशाबद्दल गावचे सरपंच बबन सुरवसे, मुख्याध्यापक पी.बी. आडसूळ यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करून गोपाळच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यावेळी माऊली इंदूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.