उस्मानाबाद : मुंबई येथील फिनॉमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेसच्या कळंब शाखेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे़ मात्र, शाखेला टाळे लागले असून, गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे़ या शाखेत गुंतविलेले पैैसे मिळावेत, या प्रकरणाचा विशेष पथकाकडून तपास करावा, आदी मागण्यांसाठी गुंतवणूकदारांनी मंगळवारी महात्मा गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
कळंब येथील सुधीर शिंदे यांच्यासह भूम, परंडा, बार्शी, कळंब, तुळजापूर व परिसरातील अनेक ठेवीदारांनी फिनॉमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेसमध्ये गुंतवणूक केली आहे़ मुदतीनंतर वेळोवेळी पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले़ या प्रकरणात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़ फिनॉमिलन हेल्थकेअर सर्व्हीसेसच्या संचालकांची मालमत्ता जप्त करावी, या प्रकरणाचा तपास विशेष पथकामार्फत करावा, चेअरमन, संचालकांचे पासपोर्ट रद्द करावेत, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, आदी मागण्यांसाठी मंगळवारी गांधी जयंतीदिनी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणात सुधीर शिंदे यांच्यासह कळंब येथील विजय जोशी, बार्शी येथील वसंत आवरे, डी़एस़देशपांडे, उपळा येथील आबा पाटील, भातंब्रा येथील अनिल मोहीर, तुळजापूर येथील प्रभाकर इंगळे, सदाशिव पौळ, प्रशांत इंगळे, मुरलीधर देवडीकर, भाटशिरपुरा येथील हरिचंद्र सिरसठ यांच्यासह असंख्य गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत़