तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:06 PM2018-10-16T17:06:51+5:302018-10-16T17:09:16+5:30
यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत हजारो भाविकांनी या पुजेचे दर्शन घेतले.
तुळजापूर : शारदीय नवरात्रौत्सवातील मंगळावारी सातव्या माळेदिवशी श्री तुळजाभवानी देवीस स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी माता यांचे दृढ भक्तीनाते दाखविणारी ‘भवानी तलवार अलंकार महापूजा’ बांधण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत हजारो भाविकांनी या पुजेचे दर्शन घेतले.
तत्पूर्वी रात्री एक वाजता चरणतीर्थ सुरू होऊन भाविकांना मुखदर्शन व धर्म दर्शनास सोडण्यात आले. यानंतर पहाटे सहा वाजता श्री तुळजाभवानीची अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेक प्रारंभ झाला. अभिषेक संपल्यानंतर नैवेद्य, धूपारती, अंगारा हे दैनंदिन धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर भोपी पुजारी यांनी गाभा-यात स्थापन केलेल्या घटकलशाचे विधीवत पूजन करून पुष्पमाला चढवली व दर्शन घेतले. त्यानंतर भोपे पुजारी संजय सोंजी, अतुल मलबा, संकेत पाटील, रुपेश परमेश्वर व महंतांनी श्री तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडली.
या पुजेत श्री तुळजाभवानी छत्रपती शिवाजी राजे यांना चांदीची तलवार देते व छत्रपती शिवराय ती नम्रपणे स्वकारून श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतात, असे दर्शविण्यात आले. शिवाय, देवीच्या उजव्या बाजूला तटबंदी किल्ला दाखवून त्यावर भगवा झेंडा फडकत असल्याची प्रतिकृती या पूजेत मांडण्यात आली होती.