उस्मानाबाद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सध्या कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे़ शिवाय, तोड लवकर होत नसल्याने शेतकरी आणखीच संकटात सापडले आहेत़ त्यामुळे वैतागलेल्या सांजा येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या ऊस पेटवून देण्याचा संकल्प केला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती़ मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी उपलब्ध नाही़ त्यामुळे ऊस जागेवरच वाळत चालला आहे़ येथील शेतकरी हे परिसरातील जवळपास ६ कारखान्यांचे सभासद आहेत़ सभासद असूनही हे कारखाने या शेतकऱ्यांचा ऊस नेत नाहीत़ मनमानी कारभार त्यांच्याकडून सुरु असल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे़ णकरी ६ हजार रुपये ऊसतोड मजुरी, वाहन एंट्री एका खेपेस ५०० रुपये घेऊन कारखान्यांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे़ त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊस उचलत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केला आहे़
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे अडचणीत आलेले हे शेतकरी २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सांजा शिवारातीलनामदेव आण्णासाहेब नायकल यांच्या फडापासून सामुहिक ऊस पेटविण्याच्या उपक्रमाला सुरुवात करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ या उपक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक सहसंचालक साखर, कारखान्यांचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना दिले आहे़