कळंब (उस्मानाबाद ) : सलग ३१ तास ४५ मिनिटे श्रम...४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर...आणि त्याने एकट्यानेच साकारली १९२०० स्क्वेअर फूट आकाराची छत्रपती शिवाजी महाराज यांची महारांगोळी. ही भव्य रांगोळी साकारून महाराजांना मानाचा मुजरा करणाऱ्या या कलावंताचे नाव आहे राजकुमार कुंभार.
तालुक्यातील शिराढोण या गावातील राजकुमार दत्तात्रय कुंभार हा एक अष्टपैलू तरूण. चित्रकार, मृदुमुर्तीकार,पोस्टर आर्टीस्ट ते रांगोळी कला असा वेगवेगळ्या कलेत त्याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच महारत मिळवलेली आहे. या आधी राजकुमार याने २००० स्क्वेअर फूट आकाराची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची, ७२०० स्क्वेअर फूटाची राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा साकारली. याचे वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळी साकारताना तो कसलाही मोबदला घेत नाही. केवळ महापुरुषांचे स्मरण व त्यांना अभिवादन करणे हाच एकमात्र उद्देश राजकुमार यातून साध्य करतो.
एकट्याने साकारली महारांगोळीराजकुमार याने ही महारांगोळी काढण्याचा संकल्प केला असता त्यांना ही रांगोळी कुठे साकारावी याबाबत जागेची अडचण निर्माण झाली. यावेळी कळंब तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार हे त्याचे मदतीला धावले. त्यांनी श्रीमंत योगी युवा मंच व मित्र साधना क्रिडा मंडळ यांच्या माध्यमातून रांगोळी साकारण्यासाठीची जागेची अडचण दूर केली.
कळंब येथील क्रिडा संकुलाची विस्तीर्ण जागेची यासाठी राजकुमार याने निवड केली. या ठिकाणी १२० बाय १६० आकारात बॅरीकेंटीग करून आतमध्ये रांगोळी साकारण्यात आली. यासाठी तब्बल ४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी सलग ३१ तास ४५ मिनिटे काम करत एकट्या राजकुमार यांनी रेखाटली आहे.
मान्यवरांच्या हस्ते उदघाटन... या महारांगोळीचे उदघाटन आज सकाळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितिन कटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार अशोक नांदलगावकर, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, रोहित दंडनाईक, बाबुराव पोटभरे, अनंत लंगडे, विलास पाटील, डी. जी. हौसलमल, संदिप बाविकर, मीनाक्षी हजारे, अॅड. राहुल कुंभार आदींची उपस्थिती होती.