उस्मानाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय पहिले बालकुमार साहित्य संमेलन २२ डिसेंबर रोजी येथील कन्या प्रशालेच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
उपाध्यक्षा पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळांतून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आपला साहित्याविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हे संमेलन भरविण्यात येणार आहे. संमेलनाची पूर्वतयारी म्हणून तालुकास्तरावर नोव्हेंबर २०१८ मध्ये कथाकथन, काव्यवाचन, क व्वाली, पोवाडा कायन, एकपात्री नाटक, लोकनृत्य, हस्तलिखित, चित्रकला आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांतील स्पर्धकांसोबतच जि.प.च्या उच्चमाध्यमिक शाळांतील ५ हजार विद्यार्थी तसेच शिक्षक सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या अध्यक्षपदी लोहारा तालुक्यातील धानुरी शाळेतील नववीच्या वर्गातील साक्षी बालाजी तिगाडे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने वातावरण निर्मितीसाठी १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरावर बालकांच्या आवडीचे ‘किल्ला’, ‘एलिजाबेथ एकादशी’, ‘हिचकी’ हे चित्रपट जिल्हा परिषद शाळांतून दाखविले जाणार आहेत. संमेलपूर्व एक दिवस अगोदर म्हणजेच २१ डिसेंबर रोजी तालुकास्तरावरील स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे कथाकथन, काव्यवाचन, क व्वाली, पोवाडा गायन, एकपात्री नाटक, लोकनृत्य, हस्तलिखित आदी स्पर्धा जिल्हास्तरावर घेतल्या जाणार आहेत.
यासोबतच संमेलनाच्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवीसंमेलन होईल. ग्रंथदिंडीमध्ये समाज प्रबोधनपर चित्ररथ सहभागी होणार आहेत. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘अलबत्या गलबत्या’ हे बालकप्रिय नाटकाचा प्रयोग होणार आहे. संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.