बायकोनं छळलंय वो... 54 पत्नीपीडित पुरूषांची सहाय्यता कक्षात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:55 PM2019-02-05T17:55:10+5:302019-02-05T18:01:44+5:30
तक्रार : विभक्त राहण्याच्या मागणीचा अधिक त्रास
सूरज पाचपिंडे
उस्मानाबाद : विवाहित महिलांचा विविध कारणांनी जाच करणाºया पतीसह सासरच्या मंडळींवर वेळोवेळी गुन्हे दाखल होत आले आहेत़ त्यात आता पत्नीच्या सततच्या कुरबुरीमुळे वैतागलेल्या जिल्ह्यातील 54 पुरूषांनी सामाजिक संस्थांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सहाय्यता कक्षात न्यायासाठी धाव घेतली आहे. एकत्रित कुटुंबातून विभक्त राहणे, सतत संशय घेणे, मोबाईलमध्ये मशगुल राहणे आदी कारणांनी आपण पत्नीमुळे त्रस्त झाल्याच्या तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत.
उस्मानाबाद शहरातील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला व मुलांकरिता सहाय्यता कक्षात वर्षभरात 33 पुरुषांनी अर्ज केले होते़ तर वाशी तालुक्यातील ईट येथील डॉ. इक्बाल ग्रामविकास मंडळाच्या कक्षात 8 पत्नीपिडीतांनी तक्रारी केल्या होत्या़ कळंब येथील लोकप्रतिष्ठाण संस्था उस्मानाबाद या संस्थेकडे 8 पत्नीपीडितांनी अर्ज केले होते. तसेच उमरगा येथील त्रिरत्न महिला बहुउद्देशिय संस्थेकडे 5 पुरुषांनी वर्षभरात तक्रारी केल्या आहेत़ जिल्ह्यातील या चार ठिकाणी झालेल्या तक्रारीत पत्नी सतत माहेरी जाणे, सासू- सासऱ्यापासून विभक्त राहण्याचा अट्टाहास, सततचा संशय, पत्नीकडून चार चौघांत शिवगाळ करुन पाण उतारा होणे, सोशलमिडीयाच्या दुनियेत मश्गुल राहत फेसबुक, व्हॉट्सअप वापरत मोबाईलमध्ये तासन तास व्यस्त राहणे आदी कारणांनी वैतागून पतीराजांनीही पत्नीच्या तक्रारी केल्या आहेत.
19 प्रकरणे प्रलंबित
वर्षभरात उस्मानाबाद, कळंब, वाशी, उमरगा या चार ठिकाणच्या सहाय्यता कक्षात 54 पुरुषांनी पत्नीच्या तक्रारी केल्या होत्या. त्यातील 35 पती-पत्नींनी सामंजस्याने एकत्र आले आहेत. तर 19 प्रकरणे प्रलंबीत आहेत.
दोन वर्षच प्रकरण
या कक्षात दोन वर्षच प्रकरण चालविले जाते़ अर्ज केलेल्या व्यक्तींचे दोन वर्षात समुपदेशन केले जाते़ त्यानंतर प्रकरण सहाय्यता कक्षातून रद्द केले जाते़ सध्या घडीला प्रलंबित राहणारी प्रकरणे ही संशायाचे व अनैतिक संबंध असणारी प्रकरणे जास्त गुंतागुतीचे असल्याचे समुपदेशकांनी सांगितले़
पीडित पत्नीही समोर येते.
या कक्षातून पुरुषांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतात़ पुरुषांनी पत्नींची तक्रार केल्यानंतर पडीतपुरुषांच्या पत्नीला फोन करुन किंवा पत्राद्वारे कळविले जाते़ काही प्रकरणातून महिलांच्या तक्रारीही समोर येतात़ त्या दोंघांच्या तक्रारी ऐकून समुपदेशन करुन त्या मिटविल्या जातात़
242 महिलांच्या तक्रारी
वर्षभरात 54 पुरुषांनी पत्नीच्या कटकटीला वैतागून तक्रारी केल्या आहेत़ तर पतीचे व्यसन, हुंडा, मुलगीच का झाली यासह इतर कारणांना वैतागून पतीपिडीत महिलांनी पतीच्या तक्रारी केल्या आहेत. यातील 158 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आले आहेत, तर 85 प्रकरणे प्रलंबित आहेत.