भूममध्ये पुन्हा घरफाेडी, चाेरट्यांचे मनाेबल उंचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:29 AM2020-12-22T04:29:41+5:302020-12-22T04:29:41+5:30
भूम - शहरातील विद्यानगर भागातील घर फाेडून अज्ञाताने लाॅकरमधील सुमारे ४० हजार रूपये लंपास केले. मागील आठ दिवसांपासून चाेर्यांचे ...
भूम - शहरातील विद्यानगर भागातील घर फाेडून अज्ञाताने लाॅकरमधील सुमारे ४० हजार रूपये लंपास केले. मागील आठ दिवसांपासून चाेर्यांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम शहरातील विद्यानगर भागातील रहिवासी भूषण सावंत हे १९ डिसेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबियांसह घरात झाेपले हाेते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास घराबाहेर कशाचा तरी आवाज त्यांना ऐकू आला. त्यामुळे सावंत यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, शेजारच्या रूममधील कपाटातील साड्या व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी लाॅकर उघडून पाहिले असता, आतील सुमारे चाळीस हजार रूपये चाेरीस गेल्याचे समाेर आले. यानंतर सावंत यांनी भूम पाेलिसांना माहिती दिली. यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचानामा केला. चाेरीच्या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिसांनी स्वतंत्र पथके निर्माण करून चाेरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही हाेवू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी भूम ठाण्यात घटनेची नाेंद करीण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाेहेकाॅ. विनाेद जानराव करीत आहेत.