उस्मानाबाद : नैसर्गिक कोरड्या रंगाची उधळण करीत शुक्रवारी साधेपणाने रंगपंचमी साजरी झाली. शहरातील विविध भागांतील प्रमुख चौकात तरुणांनी एकत्रित येऊन एकमेकांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर, गल्लोगल्ली बच्चेकंपनीने उत्सव साजरा केला.
भारतीय संस्कृतीनुसार रंगपंचमी सण फाल्गुन मासात येतो. याच कालावधीत वसंत ऋतूचे आगमन होत असल्याने, या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सध्या जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून रंग खेळू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहानास प्रतिसाद देत, शुक्रवारी सकाळपासून गल्लोगल्ली युवकांचे ग्रुप एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करीत होते, तर बच्चे कंपनीचीही एक वेगळीच धमाल दिसून आली. विविध भागांतील महिलांसह युवतींनीही रंगपंचमीनिमित्त एकमेकींना रंग लावून आंनदोत्सव साजरा केला. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही रंगपंचमी नैसर्गिक रंगाची उधळण करून साजरी केली.
पाणी मुबलक मात्र कोरोनाचा अडसर
मागील दोन-तीन वर्षे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष होते. त्यामुळे रंगपंचमी रंगाचा शिडकाव करताना हात आखडता घ्यावा लागला होता. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ५ पेक्षा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्हावासीयांना रंगपंचमी कोरडी साजरी करावी लागली.
इको फ्रेंडली रंगांना दिली पसंती...
यंदाच्या रंगपंचमीनिमित्त अनेक शाळकरी मुला-मुलींनी इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी केली. पाण्याची नासाडी टाळत कोरड्या रंगाची उधळण करून सणाचा आनंद लुटला. केमिकलमिश्रित रंगांना जाणीवपूर्वक फाटा देऊन, देशी रंगाला प्राधान्य दिले. या माध्यमातून पर्यावरणपूरक रंगपंचमीचा संदेश देण्यात आला.