सीईओ म्हणाले, ‘माऊली शपथ, मी काेणाच्या चहात मिंदा नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:38+5:302021-03-26T04:32:38+5:30
उस्मानाबाद -आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आराेप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. हा मुद्दा गुरूवारी अर्थसंकल्पीय सभेत उपस्थित ...
उस्मानाबाद -आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आराेप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. हा मुद्दा गुरूवारी अर्थसंकल्पीय सभेत उपस्थित करून गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रशासनावर थेट आर्थिक व्यवहाराचे आराेप केले. आराेपांचा राेख थेट आपल्याकडेच असल्याचे लक्षात आल्यानंतर कीर्तनकार तथा सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांनी संतप्त हाेत ‘‘माऊली शपथ, मी कुणाच्या चहाच्या कपातही मिंदा नाही. पैशाचा गैव्यवहार तर खूप दूरची गाेष्ट’’, अशा शब्दात आराेपांचे खंडण केले. बराचकाळ शाब्दिक हल्ले चालल्यानंतर उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत यांनी चाैकशी समिती नेमण्याचे आदेश दिले.
जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. यातील ७ शिक्षकांच्या जागा नसतनाही नियुक्ती दिल्याचा आराेप करीत राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे धाव घेत चाैकशीची मागणी केली. त्यांनीही सीईओ डाॅ. फड यांना पत्र देऊन अभिप्रायासह अवाहल देण्याचे फर्माण काढले. हा मुद्दा ‘लाेकमत’ने लावून धरल्यानंतर गुरूवारी अर्थसंकल्पीय सभेतही याचे पडसाद उमटले. गटनेते धुरगुडे यांनी थेट प्रशासनावरच हल्ला चढविला. जागा नसताना ७ जणांना रूजू का करून घेतले? ३५ ऐवजी ५१ जागा का दाखविल्या? वाडी-तांड्यांवर शिक्षक का दिले नाहीत? आदी प्रश्न केले. तसेच याबाबत खुलासा करण्याची मागणी उपाध्यक्ष सावंत, सीईओ डाॅ. फड यांच्याकडे लावून धरली. गैरव्यवहाराच्या आराेपांचा राेख आपल्याकडेच असल्याचे लक्षात आल्यानंतर कीर्तनकार तथा सीईओ डाॅ. फड यांनी आक्रमक झाले. ‘‘माऊली शपथ, मी काेणाच्या चहातही मिंदा नाही. पैशांचा व्यवहार करणे दूर खूप दूरची गाेष्ट’’, अशा शब्दात अप्रत्यक्ष झालेले आराेप फेटाळून लावले. यानंतर धुरगुडे यांनी ‘‘मी थेट आपल्यावर आराेप केला नाही. परंतु, जे काेणी यात सामिल आहेत, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास संशय तर येणार ना’’, असे म्हटले. आराेप-प्रत्याराेप थांबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उपाध्यक्ष सावंत यांनी चाैकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभा आर्थिक नियाेजनाने कमी अन् भ्रष्टाचाराच्या आराेपानेच अधिक गाजली.