रंजल्या-गांजल्यांच्या द्वारी ‘सीईओं’ची स्वारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:32 AM2021-01-03T04:32:07+5:302021-01-03T04:32:07+5:30
कुष्ठरूग्णांच्या जाणून घेतल्या व्यथा -साेयीसुविधा पुरविण्याच्या केल्या सूचना उस्मानाबाद -शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुष्ठधाममध्ये काही वयाेवृद्ध निराधात कुष्ठरूग्ण वास्तव्यास ...
कुष्ठरूग्णांच्या जाणून घेतल्या व्यथा -साेयीसुविधा पुरविण्याच्या केल्या सूचना
उस्मानाबाद -शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुष्ठधाममध्ये काही वयाेवृद्ध निराधात कुष्ठरूग्ण वास्तव्यास आहेत. दानशूर व्यक्तींकडून मिळेल ते खाऊन हे रूग्ण आपल्या पाेटाचे खळगे भरून येणारा दिवस मागे टाकत आहेत. या ठिकाणी ना त्यांची घरे सुस्थितीत आहेत ना स्वच्छतागृहाची सुविधा. हे समजल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड कार्यालयीन सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी कुष्ठधाममध्ये दाखल झाले. त्यांनी येथील रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेत सुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
कुष्ठरूग्णांचे प्रमाण घटल्यानंतर शासनाने येथील कुष्ठधामची रसद बंद केली. मात्र, काेणाचाही सहारा नसणारे दहा ते अकरा वयाेवृद्ध कुष्ठरूग्ण कुष्ठधामध्ये वास्तव्यास आहेत. मध्यंतरी यातील काहीजण येथून आपल्या गावी निघून गेले. तर काहीजण दगावले. त्यामुळे सध्या येथे पाच ते सहा रूग्ण वास्तव्यास आहेत. या रूग्णांना कुठल्याही स्वरूपाची सरकारी मदत मिळत नाही. त्यामुळे यांचे जीवन दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांच्या मदतीवर अवलंबून आहे. रूग्ण राहत असलेल्या घरांची पडझड झाली आहे. तसेच स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट आहे. ही बाब जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी थेट कुष्ठधाम गाठले. येथे गेल्यानंतर उपलब्ध साेयीसुविधांची पाहणी केली. यानंतर एकेका कुष्ठरूग्णाशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुष्ठराेगाने त्रस्त असलेल्या या रूग्णांना प्रामुख्याख्याने स्वच्छतागृहाची सुवधा नसल्याची बाब समाेर आल्यानंतर त्यांनी उपस्थित अधिकार्यांना स्वच्छतागृह उभारणीच्या अनुषंगाने तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले. यासाेबतच अन्य सुविधा पुरविण्याच्या अनुषंगानेही प्रयत्न करण्यास त्यांना यंत्रणेला सूचविले. यावेळी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. वडगावे, गटिवकास अधिकारी दिवाणे, मदर तेरेसा ट्रस्टचे अध्यक्ष कल्याण बेताळे, शिक्षक संघटनेचे बशीर तांबाेळी आदी उपस्थित हाेते.
चाैकट...
‘पहिल्यांदाच माेठे साहेब आले’
मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कुष्ठधाम येथे जावून रूग्णांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी एका रूग्णाने ‘‘आजवर अनेक अधिकारी हाेऊन गेले. परंतु, काेणीही आमच्यापर्यंत आले नाही. पहिल्यांदाच माेठे साहेब आमच्यापर्यंत आले. त्यामुळे आमच्या समस्या आता सुटतील’’, असा विश्वास व्यक्त केला.