तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : छत्रपती संभाजीराजे यांच्या तुळजाभवानी मंदिरातील अवमान प्रकरणी सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तुळजापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देऊळ कवायत नियमावलीचा दाखल देत छत्रपतींना देवी गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले होते. या प्रकाराचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
गुरुवारी सकाळपासूनच संपूर्ण तुळजापूर शहर व्यापाऱ्यांनी व शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. यामुळे परप्रांतातून आलेल्या भाविक व नवदांपत्यांची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय झाली. यासाठी त्यांना बंद हॉटेल चालकांचा आसरा घ्यावा लागला. भाविकांना खाण्यापाण्यासंदर्भात संबंधिताना विचारणा करावी लागली. यावेळी हॉटेल चालक व व्यापारी यांनी शहराच्या बाहेरील हॉटेल व धाबे उघडे आहेत तेथे जाऊन तुम्ही चहा नाश्ता जेवण करू शकता असे सांगितले. यामुळे खाजगी वाहन धारकांची व्यवस्था होऊ शकली. परंतु एसटीने आलेल्या भाविकांची गैरसोय झाली ही झालेली गैरसोय पाहून शहरातील पुजारी वर्ग व व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन महाद्वार परिसरात शिरा, केळी व पाणी यांची मोफत व्यवस्था केली.
आजच्या बंदमध्ये मेडिकल दुकानदार, पेट्रोल पंप चालक, टपरीवाले, फळविक्रेते यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. यामुळे तुळजापूर शहरात प्रथमच इतका कडकडीत बंद पाहण्यास लोकांना मिळाला. छत्रपती संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली असली तरी मराठा ठोक क्रांती मोर्चा, पुजारी वर्ग यांनी संबंधितावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे शहर बंद नंतर पुढचे पाऊल काय असणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.