उस्मानाबाद : १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वादळी वारा, पाऊस व गारपीठ यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीच्या सरकारने २० कोटी ५८ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केल्याची माहिती आ. कैलास पाटील यांनी दिली.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी यांनी त्यावेळी बाधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला होता. आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत संयुक्त पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या १६ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निधीची प्रतिक्षा होती. आता जिल्ह्यासाठी २० कोटी ५८ लाखाचा निधी मिळाला असून, कळंब तालुक्यात नुकसानीचा आकडा अधिक असल्याने या तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात खा. ओम राजेनिंबाळकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर भरपाई मंजूर करून यासाठी निधीची तरतुद देखील झाल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे.
चौकट......
जिल्ह्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ९४५ इतकी होती. त्यातील एकट्या कळंब तालुक्यातील बाधितांची संख्या २९ हजार ९२७ एवढी आहे. कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यामध्ये २४ हजार ५६९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झालेले होते.