उमरगा : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर गतवर्षी विक्री केलेल्या हरभरा, तुरीचे १० कोटी ७३ हजार रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज दुपारी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी शासनाच्या हमीभाव केंद्रावर विक्री केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे मिळावेत यासाठी प्रदिप भोसले या शेतकऱ्याने सोमवारी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते़ काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही दीड हजार शेतकऱ्यांचे हरभरा, तुरीचे रखडलेले १० कोटी ७३ हजार रूपये तात्काळ बँक खात्यावर जमा करावेत, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले़ तासभर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले़ यावेळी माजी पंचायत समिती सभापती मदन पाटील, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे, बसवराज कस्तुरे, नगरसेवक एम़ओ़ पाटील, परमेश्वर टोपगे, विक्रम मस्के, महेश माशाळकर, वसीम शेख, परमेश्वर टोपगे, राहुल सरपे, दिगंबर औरादे, ज्ञानेश्वर पाटील, शरद तळभोगे, दादासाहेब गायकवाड, सतीश कांबळे, सोहेल इनामदार, जीवन सरपे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़