भरधाव कारच्या धडकेत कोरोना योद्धा शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:36 PM2020-08-20T19:36:05+5:302020-08-20T19:36:51+5:30
अपघातानंतर घटनास्थळावरून कारचालकासह अन्य दोघे फरार झाले आहेत.
तुळजापूर : कोरोना कक्षाची संपवून तुळजापूरकडे दुचाकीवर परत येणाऱ्या ५० वर्षीय शिक्षकास भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळावरून कारचालकासह अन्य दोघे फरार झाले आहेत.
मयत भीमाशंकर शिवहार होर्टे (वय ५०, रा.बारूळ) हे किलज नागझरी लमाण तांडा जिल्हा परिषद शाळेवर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते शाळेमधील कोरोना कक्षातील ड्युटी संपवून तुळजापूरकडे दुचाकीवरून (क्र.एमएच. २५/झेड. ७२९२) येत होते. त्यांची दुचाकी लातूर रोडवर वडगाव लाख शिवारात आली असता पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच. २४/व्ही. ९२८८) जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी अक्षरश: शंभर फुट दूर अंतरावर फेकली गेली. यात शिक्षक होर्टे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कारचालकासह अन्य दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. मयत भीमाशंकर होर्टे यांच्या पाश्चात्य मुलगा, मुलगी, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.
अधिकारी, शिक्षक धावले
अपघाताची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, केंद्रप्रमुख अशोक स्वामी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे धनंजय मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिक्षक भीमाशंकर शिवहार होर्टे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी मयत घोषित केले.