वसतिगृहातील ५१ मुलींना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:54+5:302021-05-09T04:33:54+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी गावानजीक असलेल्या एका मुलीच्या वसतिगृहात दोन टप्प्यांत केलेल्या तपासणीमध्ये ५१ मुलींना कोरोनाची बाधा झाल्याचे समाेर ...
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी गावानजीक असलेल्या एका मुलीच्या वसतिगृहात दोन टप्प्यांत केलेल्या तपासणीमध्ये ५१ मुलींना कोरोनाची बाधा झाल्याचे समाेर आले आहे. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तातडीने वसतिगृहास भेट देऊन सर्व बाधितांची तेथेच वैद्यकीय सोय करून दिली.
आळणी येथील वसतिगृहातील काही मुलींना ताप व सर्दी झाल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी तातडीने आळणी उपकेंद्राच्या आरोग्यपथकासह तातडीने येथे धाव घेऊन ४५ विद्यार्थिनी व १६ शिक्षक, कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या ६१ जणांपैकी २५ विद्यार्थिनी व दोन कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर शनिवारी पुन्हा राहिलेल्या ६४ विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. यामध्ये २६ जणी पॉझिटिव्ह आल्या. या वसतिगृहातील एकूण ५३ जण बाधित आढळून आल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी वसतिगृहास भेट देऊन वैद्यकीय उपचार व सुविधांबाबत आरोग्य विभागास सूचना केल्या. तीव्र लक्षणे नसल्याने या सर्वांवर वसतिगृहातच उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक या ठिकाणी भेट देऊन सर्वांच्या आरोग्याची तपासणी करून उपचारांबाबत मार्गदर्शन करेल, असेही दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले.