जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला कोरोनाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:16+5:302021-03-05T04:32:16+5:30
१ ते १९ वयोगटातील किमान ६८ बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच ...
१ ते १९ वयोगटातील किमान ६८ बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना दरवर्षी शाळा, अंगवाड्यातून जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अंगणवाड्या बंद आहेत. शिवाय इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत चे वर्ग सुरू असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० ते ६० टक्के इतकीच असते. अशा परिस्थितीत जंतनाशक मोहीम राबविण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप करण्याचे काम केले जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य
उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
चौकट..
१,२४७ आशा स्वयंसेविकांची फौज
जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ५१५ मुला-मुलींना शाळेतून व घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येत आहेत. गोळ्या वाटपासाठी १,२४७ आशा स्वयंसेविकांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मदतीला अंगणवाडी सेविका व मदतनीस देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाची होतेय दमछाक
दरवर्षी शाळा अंगवाड्यातून जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जात होत्या. मात्र या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे अंगणवाड्या बंद आहेत. तसेच इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. त्यामुळे सध्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागांमध्येही रुग्ण वाढत असल्याने जंतनाशक गोळ्या वाटप करताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे.
कोट...
दरवर्षी शाळा, अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविली जात होती. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. शाळांना विद्यार्थी नाहीत. त्यामुळे घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जात आहेत. १ ते २ वयोगटातील मुलांना अर्धी तर २ वर्षापुढील मुलांना १ गोळी दिली जाते. या मोहिमेंतर्गत १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना गोळ्या देण्यात येणार आहेत.
डाॅ. हनुमंत वडगावे,
जिल्हा आरोग्य अधिकारी