CoronaVirus : ७० वर्षीय शेतकऱ्याची आभाळमाया; घरोघरी जाऊन २०० गरीब कुटुंबांना केली अन्नधान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 02:49 PM2020-04-09T14:49:58+5:302020-04-09T14:51:30+5:30
तांदूळ आणि साखरेचे केले वाटप
- बालाजी बिराजदार
लोहारा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरीबांची उपासमार होऊ नये, यासाठी अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येत आहेत.त्यातच लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ७० वर्षीय वृध्द शेतकऱ्यांने आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गावातील दोनशे गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके तांदुळ,साखरेचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे रघुनाथ यादवराव कदम (वय ७०) हे आपल्या कुटुंबासोबत राहातात. त्यांना दोन मुल व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांना केवळ चार एकर शेतजमिन आहे. या चार एकर शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. त्यात रघुनाथ कदम यांनी वयाची सत्तरी ओलांडली असली तरीही शेतात काबाडकष्ट आज ही ते करत आहेत. शेतातून मिळालेल्या उत्पन्नातून काही वाटा सामाजिक कामासाठी काढून ठेवतात. सध्या कोरोनासारख्या महामारीने जगाला विळखा घेतला आहे. या कोरोना संसर्गाचा वाढता प्रदुर्भावा रोखण्यासाठी देश,राज्य लॉकडाऊन करुन सिमा सिल करण्यात आल्या आहे. यामुळे सगळेच उद्योग, व्यवसाय बंद झाली आहेत. त्याचा ग्रामीण भागात अधिक प्रभाव पडल्यामुळे गरीबांच्या हाताला काम मिळत नाही. ज्यांचे हातावर पोट आहे. अशा अत्यंत गरीब कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील कानेगाव येथे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. मागील पंधरा दिवसापासून काम बंद असल्याने येथील गरीबांची परवड होत आहे. ही बाब लक्षात येताच रघुनाथ कदम यांनी गावातील सुमारे २०० गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके तांदुळ, साखरेचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अन्नधान्याची खरेदी केली. बुधवारी टमटममध्ये धान्य टाकून प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जावून अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी नारायण लोभे,विवेक बनसोडे, गोविंद कदम,कृष्णा कदम,हरिभाऊ क्षीरसागर आदी उपस्थित होते.