लोहारा (जि.उस्मानाबाद) : या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहेत. त्यात फळबागायत शेतकरी ही वेगळा नाही.अशातच एका फळबाग शेतकरी तथा सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकाऱ्यांने दहा एकरवरील चिक्कुची विक्री न करता कोरोनाशी दोन हात करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत वाटप केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात,देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आधी दुष्काळ मग अवकाळी यातून कसाबसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आला आहे. मात्र,या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहेत. त्यात फळबागायत शेतकऱ्यांची व्यथा वेगळी नाही. अनेक शेतकऱ्यांचे टरबुज रानावरच सडले. तर कोणी मोफत वाटले. त्या द्राक्ष बागायतदार ही यातून सुटला नाही. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहेत. यामुळे आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्देशाने लोहारा तालुक्यातील चिक्कू उत्पादक शेतकरी तथा सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय सुतार यांनी गेल्यावर्षी पेक्षाही यावर्षी लॉकडाऊनमध्ये चिक्कुला दुप्पट भाव असला तरी दहा एकरावरील चिक्कूची बाग ही कोरोनाशी दोन हात करत असलेल्या आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी मोकळी करुन दिली आहे. तालुक्यातील ग्रामिण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर,कर्मचारी तसेच रुग्ण यांना मोफत चिक्कू देण्याचे ठरवले असून यांचा शुभारंभ तहसिलदार विजय अवधाने यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक काळे,तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग,स्पर्श ग्रामिण रुग्णालयाचे रमाकांत जोशी,सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय सुतार,दत्ता वाघमारे, राजेंद्र कांबळे,स्वामी आदी उपस्थितीत होते.
सामाजिक बांधीलकीतून उपक्रमकोरोनामुळे लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत सुद्धा अनेक सामाजिक संस्था, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते आणि अन्नदान करणारे अनेक लोक आहेत. ते जे की गरजू आणि अडचणी मध्ये सापडलेल्या लोकांच्या जेवणाची व इतर अनुषंगिक सोय करत आहेत. हे सुरू असलेले काम खरच खूप अभिमानास्पद आहे.त्यात आपण ही मदत केली पाहीजे म्हणून मी दहा एकरावरील चिक्कू हे चांगला भाव असताना ही विक्री न करता कोरोनाशी दिवस रात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरविले आहे असे सुतार यांनी सांगितले.