CoronaVirus : पोलीस पाहताच वस्तऱ्यासह नाव्हीदादाने ठोकली धूम; ग्राहकही पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:31 AM2020-04-03T11:31:43+5:302020-04-03T11:34:17+5:30
बंदी असतानाही एका वस्तीवर खुल्या जागेत थाटले होते दुकान...
- देवीसिंग राजपूत
येणेगूर (जि. उस्मानाबाद) : पोलीस आले रे...पळा..पळा...अशी आरोळी कानी पडताच भिंतीच्या आडोशाला दुकान थाटलेले नाव्हीदादा हातातील वस्तºयासह तर खुर्चीतील ग्राहकाने अर्धवट दाढी अन् गळ्यातील पांढऱ्या कपड्यासह बाजुच्या शेतात धूम ठोकली. वेटिंगमध्ये थांबलेल्या आठ-दहा लोकांनीही मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. चिंचेच्या झाडाखाली थांबलेले काही तरूणही पोलिशी दंडुक्याच्या भितीने दिसेल त्या मार्गाने पळत सुटले.
उमरगा तालुक्यातील येणेगूर गावातील मायनाळे वस्तीवरील ही घटना़ लॉकडाऊनमुळे गावातीलच एका नाव्ह्याने वस्तीतील एका घराच्या भिंतीचा आडोसा पाहून खुल्या जागेत केशकर्तनालय सुरू केले. नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी नाव्ही वस्तीवर आले असता दहा ते बारा ग्राहक वाट पहात थांबले होते. सुरूवातीला एक-दोन ग्राहकांची हजामत झाल्यानंतर वेटिंगमधील तिसरा खुर्चीत जाऊन बसला. त्याची हजामत अर्धी उरकली होती.
याचवेळी वस्तीतील एका सजग व्यक्तीने फोन करून पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. थोडाही विलंब न लावता येणेगूर दूरक्षेत्रचे पोना दिगंबर सूर्यवंशी वस्तीवर दाखल झाले. खुल्या जागेतील केशकर्तनालयापासून काही अंतरावर ते असतानाच ‘‘पोलीस आले रे’’, अशी आरोळी काहींनी ठोकली अन् नाव्हीदादा दचकले. पोलीस नजरेस पडताच बाजुलाच असलेल्या शेतात खुर्चीतील ग्राहकाच्या अगोदर धूम ठोकली. नाव्हीदादा साहित्य जागेवर सोडून पळाल्याचे पाहून अर्धवट दाढी अन् गळ्यात बांधलेला कपडा घेऊन नाव्हीदादाच्या मागे पळ काढला. वेटिंगमध्ये थांबलेले आठ-दहा जणही मिळेल त्या मार्गाने पळून गेले. नाव्हीदादा का पळताहेत हे उमगलेले नसतानाही दंडुक्याच्या भितीने चिंचेच्या झाडाखाली थांबलेले दहा-बारा तरूणही गावातील गल्लीबोळाने पसार झाले. सदरील गोंधळाची गुरूवारी दिवसभर येणेगुरात चर्चा सुरू होती. दरम्यान, ‘ते’ नाव्ही कोण? याचा शोध आता येणेगूर दूरक्षेत्रच्या पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.