तुळजापूर (जि़. उस्मानाबाद) : कोरोनाच्या संकटात अडकून पडलेली द्राक्षे मातीमोल होत असतानाही तळजापूर तालुक्यातील मसला येथील एका शेतकऱ्याने आपले मोठे मन दाखवून दिले आहे़ तब्बल १ लाख रुपयांची मदत या शेतकऱ्याने अडचणीत असतानाही पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीला सोमवारी केली.
मसला खुर्द येथील शेतकरी चंद्रकांत विनायक नरवडे यांची दहा एकर शेती आहे़ त्यातील ५ एकर कोरडवाहू असून, ५ एकरावर त्यांनी द्राक्षाची लागवड केली आहे़ ऐन तोडणीच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरला़ तत्पूर्वीच त्यांची दोन एकरावरील द्राक्षे बाजारपेठेत गेली होती़ मात्र, पुरेसा दर मिळाला नसल्याने फारसा फायदा झाला नाही़ आजघडीला उर्वरित ३ एकरावरील द्राक्षे अजूनही वेलीला लगडलेली आहेत़ बाजारपेठ बंद असल्याने ती खरेदी करण्यास कोणताही व्यापारी पुढे आला नाही़ त्यामुळे ही द्राक्षे आता गळून मातीमोल होऊ लागली आहेत़ नरवडे यांनी त्यावर केलेला मोठा खर्च वाया जात आहे़ असे असतानाही त्यांनी शेतक-याचे औदार्य दाखवीत सोमवारी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीला प्रत्येकी ५० हजार रुपये, याप्रमाणे १ लाख रुपयांची मदत देऊ केली़ तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, लक्ष्मण नरवडे, नितीन कदम यांच्या उपस्थितीत चंद्रकांत नरवडे यांनी ही मदत तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे सुपूर्द केली़ त्यांनी दाखविलेल्या या दानशूरवृत्तीचे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले़ दरम्यान, शेतातच राहिलेली ३ एकरावरील द्राक्षे राणादादा मित्रमंडळाच्या माध्यमातून गरजूंना मोफत वाटण्यासाठी देण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला़
अडचणीत शासनालाही दिले पाहिजे़़़शासन आम्हा शेतक-यांना प्रत्येक अडचणीच्या वेळी फूल नव्हे तर फुलाची पाकळी का असेना, मदत करीत असते़ आता कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाला निधीची गरज आहे़ अशा परिस्थितीत एक शेतकरी म्हणून दोन एकर द्राक्षाच्या उत्पन्नातून मिळालेले पैसे मी देऊ केले आहेत़ इतरांनीही शक्य असेल तितकी मदत शासनाला द्यावी़- चंद्रकांत नरवडे, शेतकरी, मसला (खु़)