उस्मानाबाद : एका कार्यक्रमानिमित्त पानिपतला जाऊन आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटीव्ह आला आहे. हा रुग्ण उमरगा तालुक्यातील असून, या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़
उमरगा तालुक्यातील एक तरुण आपल्या पत्नीसह १२ जानेवारी रोजी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त पानिपतला गेला होता. तो दिल्लीमार्गे २५ मार्च रोजी आपल्या गावी परतला होता. दरम्यान, दिल्लीतील प्रकार उघडकीस आल्यानंतर बुधवारी ग्रामस्थांनी त्याला तपासणीचा आग्रह केला. मात्र, त्याने आपण यापूर्वीच तपासणी केली असल्याचे सांगितले़ गावकऱ्यांनी पिच्छा पुरविल्यानंतर अखेर बुधवारी त्याने उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. येथे त्याची तपासणी करुन त्याचे व त्याच्या पत्नीचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. एकूण ७ जणांचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला असून, यातील केवळ या तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्या २५ वर्षीय पत्नीचा अहवाल मात्र, निगेटीव्ह आला आहे.
हा अहवाल येताच आरोग्य विभागाने हालचाली वाढविल्या असून, तो गावात परतल्यानंतर कोणाच्या संपर्कात आला होता, त्यांची यादी करण्यास सुरुवात केली आहे. या तरुणाच्या घरातच त्याच्यासह एकूण १० सदस्य असल्याचे कळते. पॉझिटीव्ह आढळलेला हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिलाच रुग्ण आहे.