CoronaVirus : उस्मानाबाद जिल्ह्यात तिसरा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण, आधीचे संपर्कातील निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:08 AM2020-04-05T11:08:08+5:302020-04-05T11:25:16+5:30
coronavirus : उमरगा तालुक्यातील बलसुर व लोहारा तालुक्यातील धानुरी येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी रात्री उघड झाले होते.
उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण सापडून दोन दिवसही उलटत नाहीत तोच या यादीत आणखी एक नव्या रुग्णाची भर पडली आहे. हा रुग्ण उमरगा शहरातील असून, त्याचा प्रवास इतिहास व संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे काम सुरू झाले आहे.
उमरगा तालुक्यातील बलसुर व लोहारा तालुक्यातील धानुरी येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी रात्री उघड झाले होते. त्यानंतर दोन दिवसात त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला.
या अहवालानुसार बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्ती निगेटिव्ह आहेत. ही दिलासा देणारी बाब असली तरी याच यादीत गुरुवारी नमुना पाठविण्यात आलेल्या उमरगा शहरातील एका व्यक्तीचाही अहवाल आला आहे. तो पॉझिटिव्ह असल्याने ऐन मध्यरात्री प्रशासनाची झोप उडाली.
या व्यक्तीचा प्रवास इतिहास शोधण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तो किती जणांच्या संपर्कात आला होता, याचीही माहिती घेतली जात आहे. हा व्यक्ती राहत असलेल्या उमरगा शहरातील भाग सील करण्याच्या कामास रात्री उशिरा सुरुवात झाली होती.