चेतन धानुरे ( जिल्हा प्रतिनिधी)
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रा़रविंद्र गायकवाड यांना शिवसेनेने यावेळी उमेदवारी नाकारली आहे़ लोकसभेला नव्या चेहºयास संधी देताना सेनेने माजी आ़ओम राजेनिंबाळकर यांना मैदानात उतरविले आहे. खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी सेनेतील एक गट अत्यंत सक्रीय बनला होता. गेल्या काही दिवसांपासून हा गट मुंबईतच तळ ठोकून होता़ अखेर त्यांच्या प्रयत्नाला ‘मातोश्री’ने दाद देत गायकवाड यांचा पत्ता कापला. आज दुपारी सेनेने उस्मानाबादसाठी ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली़
नव्या दमाच्या चेहऱ्याला संधी दिल्याने या मतदारसंघातील चुरस कमालीची वाढणार असल्याचे दिसते आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे़ त्यांनी अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, असे असले तरी माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांचीच उमेदवारी निश्चित समजली जात आहे़ पाटील व राजेनिंबाळकर यांच्यातील राजकीय व कौटुंबिक वैर सर्वज्ञात आहेच़ आता सेनेने ओमराजेंना समोर केल्याने राष्ट्रवादीही राणा पाटील यांनाच मैदानात उतरवेल अशी अटकळ बांधली जात आहे. या दोघांमध्ये मागील मागील दोन विधानसभा निवडणुकीत तगड्या लढती झाल्या होत्या़ दोघेही एकेकवेळा निवडून आले आहेत़ दरम्यान, या बदलामुळे स्थानिक शिवसेनेत गटबाजी वाढीस लागण्याची शक्यता आहे़ जुन्या शिवसैनिकांनी रवी गायकवाड यांची पाठराखण केली होती़ आता या बदलामुळे ते काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
कोण आहेत ओम राजेनिंबाळकर
ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पवनसिंह राजेनिंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. पवनसिंह व डॉ़पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय व कौटुंबिक वैर संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच़ २००४ मध्ये या दोघांत उस्मानाबाद विधानसभेसाठी लढत झाली होती. अटीतटीच्या लढतीत डॉ.पद्मसिंह ४८४ मतांनी विजयी झाले होते. पवनराजेंच्या हत्येनंतर २००९ मध्ये सेनेने त्यांचे चिरंजीव ओमराजेंना विधानसभेची उमेदवारी दिली. या लढतीत त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर मात केली होती. त्यापुढील २०१४च्या निवडणुकीत मात्र राणा पाटील यांनी पराभवाची परतफेड केली. आता हेच दोघे लोकसभेच्या आखाड्यात दिसण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांचे शिक्षण
का कापली गायकवाडांची उमेदवारी?महाराष्ट्र सदनात रोजेकऱ्यासोबत झालेला वाद, त्यानंतर विमान कर्मचाºयाला केलेल्या मारहाणीनंतर खासदार रवी गायकवाड देशभर चर्चेत आले होते़ स्थानिक मतदारसंघात मात्र, त्यापेक्षा ‘नॉट रिचेबल खासदार’ अशीच ख्याती त्यांनी मिळाली़ खासदार निधी पूर्ण खर्च केला तरी दृश्य विकास झाला नाही, असाही प्रसार झाला़ याचेच भांडवल करीत सेनेचे उपनेते आ़तानाजी सावंत यांच्या गटाने ‘मातोश्री’वर फिल्डिंग लावली़ जवळपास आठ-दहा दिवस तेथेच तळ ठोकून या गटाने गायकवाडांचा पत्ता कापत उमेदवारी आणली आहे़