- संतोष वीर ( उस्मानाबाद )
पोलीस खात्यातील नोकरी करतानाही मनातील शेतीविषयीची आस्था स्वस्थ बसू देईना, यातूनच त्याने भूम तालुक्यातील वांगी खुर्द या आपल्या गावी तीन एकरांवर रोपवाटिकेची उभारणी करून ६ लाख रोपांची निर्मिती केली आहे़ रोपांचा दर्जा टिकविण्यासाठी या तरुणाने घेतलेली मेहनत आता फळास येत असून, या वाटिकेतील सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत़ विजय गिरी, असे या धडपडी तरुणाचे नाव असून, त्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
अकरावीत असतानाच विजय गिरी याने फळबाग योजनेंतर्गत १०० केशर आंब्यांची लागवड केली होती़ त्यातील बरीचशी रोपे वाया गेल्यानंतरही उर्वरित रोपे त्याने जिद्दीने जगविली व जगलेल्या रोपांची कलमे करून पुन्हा नवी रोपे तयार केली़ यातूनच त्याच्यात रोपनिर्मितीची आवड निर्माण झाली़ अवघ्या काही वर्षांतच त्याने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तब्बल २० हजार रोपे तयार करून दिली़ मात्र, मध्येच अवतरलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचा फळबागांकडील कल कमी झाला़ पर्यायाने विजयची छोटीशी रोपवाटिकाही कोलमडून पडली.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले़ दुसऱ्या प्रयत्नात तो बीड पोलीस दलात भरती झाला़ सध्या तो पाटोदा ठाण्यात कार्यरत आहे़ अंगावर खाकी चढली तरी मनातील शेतीशी जुळलेली नाळ त्याला नेहमी खुणावत होती. काळ्या आईशी असलेले घट्ट नाते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. यातच २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने त्याने रोपवाटिका उभी करण्याचा चंग बांधला. नुसता चंग बांधून तो थांबला नाही, तर रोपवाटिका यशस्वी करून दाखविली.
आज त्याने एक हेक्टर ३० गुंठ्यांत आपली मोठी रोपवाटिका साकारली आहे़ त्यात तब्बल ६ लाखांवर रोपे तयार केली आहेत़ त्याच्या या धडपडीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे़ उस्मानाबाद, लातूरसारख्या अवर्षणप्रवण भागात फळबागा जगविणे हे महाकठीण काम़ त्यामुळे अल्प पाण्यातही जगणारे फळपीक म्हणून लौकिक असलेल्या सीताफळावर विजयने लक्ष्य केंद्रित केले आहे़ त्यावर चांगली मेहनत घेतल्याने नुकतीच त्याची सीताफळाची रोपे केनियातील शेतकऱ्यांनी मागवून घेतली आहेत़ पुण्यात झालेल्या कृषी प्रदर्शनात त्याने ही रोपे ठेवली होती़ तेथूनच्या विजयने ग्लोबल मार्केटला गवसणी घालण्यास सुरुवात केली आहे़
मी विकसित केलेले सीताफळ हे साधारणत: गावरान सीताफळाचा सीझन संपल्यानंतर येते़ नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हे फळ बाजारात नेता येते़ त्यामुळे चांगला भाव मिळतो़ मुंबईच्या बाजारपेठेत मी ही सीताफळे इतक्यातच २०० ते २५० रुपये कि.ग्रॅ. दराने विकली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होत आहे. कोणतेही काम जिद्दीने केले, तर ते पूर्णत्वास जाऊन यश नक्कीच मिळते, असे विजय गिरी याने सांगितले.